आयकर विभागाच्या जनजागृती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
करदात्यांमध्ये करप्रणालीबाबत जागरूकता निर्माण करण्यासह टीडीएस आणि आयकरासंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्याच्या उद्देशाने आयकर विभागाच्या वतीने अलिबागमध्ये जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी करदात्यांशी थेट संवाद साधत विविध कर विषयांवर मार्गदर्शन केल्याने उपस्थितांकडून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अलिबाग नगरपरिषदेच्या सभागृहात ठाणे-पनवेल आयकर विभागाच्या टीडीएस शाखेतर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पुणे येथील आयकर आयुक्त वैभव जैन आणि ठाणे येथील अतिरिक्त आयकर आयुक्त समृद्धी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे येथील उपआयकर आयुक्त शैलेश कुमार, आयकर अधिकारी गिरीश कांबळे आणि पनवेल येथील आयकर अधिकारी रत्नेश कुमार यांनी करदाते व कर कपात करणाऱ्यांना टीडीएसची अंमलबजावणी, आयकर नियम, कर भरण्याची प्रक्रिया तसेच विविध कायदेशीर बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत अधिकाऱ्यांनी संवादात्मक पद्धतीने शंकानिरसन केले.
रायगड जिल्ह्यातील सुमारे 70 करदाते आणि कर कपात करणाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनीही कार्यशाळेला उपस्थित राहून आयकर विभागाच्या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी उपआयकर आयुक्त शैलेश कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा अक्षया नाईक म्हणाल्या, करप्रणालीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहेत. करदात्यांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन करासंदर्भातील नियम व जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात.






