शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मागणी; तालुक्यात भाताची 3300 हेक्टरवर लागवड
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या भाताची सुमारे 3300 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर पडलेला पावसाचा खंड, अशा बदलत्या हवामानाचा भात पिकावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच काही भागांत भात पिकावर करपा रोगाचा तुरळक प्रादुर्भाव आढळून आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने काही भागांत भाताची लागवड उशिराने झाली. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रोपे वाहून गेली, तर शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. काही भागांत भातपीक आडवे पडल्याचेही दिसून आले.
अतिपावसानंतर आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा पाण्याच्या ताणाचे संकट उभे राहिले आहे. दुबार लागवडीनंतर उभे राहिलेले भातपीक वाढीच्या अवस्थेत असताना सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्याने अनेक ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला आहे. भाताच्या लोंब्या भरण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण निर्माण झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत व नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही तातडीने पाहणी करून त्यांना शासनाच्या निकषांनुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पावसातील खंड तसेच वाढत्या तापमानामुळे आगामी काळात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करावी, कीड रोग आढळून आल्यास त्यावर उपाययोजना करावी तसेच स्थानिक पातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
‘क्रॉप-सॅप’ योजनेंतर्गत गाव पातळीवर भात पिकावरील कीड आणि रोगांची नियमित निरीक्षण कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात येत आहेत. तसेच गावपातळीवर गाव बैठका, शेतीशाळा, ग्रामसभा, एसएमएस, या माध्यमातून भात पिकावरील कीड व रोग यावरील उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे, अशी माहिती मुरूड तालुका सहाय्यक कृषी अधिकारी मनोज कदम यांनी दिली. शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून कीड किंवा रोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात तालुका कृषी अधिकारी प्रमोद नरळे यांनी केले आहे.
खारआंबोली येथील शेतकरी मनोज कमाने यांनी सांगितले की, उतरा नक्षत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने आंबोली परिसरातील शेतीमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आता हत्ती नक्षत्रातही समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असून, वेळेवर पाऊस झाल्यास पिकांना दिलासा मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु, पाऊस पडला नाही शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले तरी शासनाने आमच्या ही शेतकऱ्यांचा विचार करुन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मनोज कमाने यांनी केली.






