पनवेल पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर संताप

वाहनावर फांदी कोसळल्याने नुकसान; पनवेलमधील ठाकरे गट आक्रमक

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी लाखो रुपयांची कामे मंजूर झाल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आजही रस्त्यावर, वीजवाहिन्यांवर आणि वाहनांवर धोकादायक अवस्थेत लोंबकळत असल्याचे वास्तव आहे. याच निष्काळजीपणामुळे खारघर येथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर एका मोठ्या झाडाची फांदी कोसळल्याने त्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख नंदू वारुंगसे यांनी, या घटनेनंतर पनवेल महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पनवेल महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी लाखो रुपयांची कामे मंजूर झाल्याचा दावा केला जात होता. परंतु, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आजही रस्त्यावर, वीजवाहिन्यांवर आणि वाहनांवर धोकादायक अवस्थेत लोंबकळत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे याच निष्काळजीपणाचा फटका मंगळवारी (दि.21) खारघर सेक्टर 13 येथील एनकेजीएसबी बँकेजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला बसला. याठिकाणच्या एका मोठ्या झाडाची फांदी या उभ्या असलेल्या वाहनावर कोसळल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना एखाद्या नागरिकाच्या जीवावरही बेतू शकली असती. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख नंदू वारुंगसे यांनी, पालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी सांगितले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खारघर परिसरातील धोकादायक झाडे आणि लोंबकळणाऱ्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करून प्रशासनाला इशारा दिला होता. संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून संभाव्य दुर्घटनांची शक्यता स्पष्टपणे मांडली होती. मात्र, प्रशासनाने या निवेदनांकडे दुर्लक्ष केले आणि वेळेत कोणतीही प्रभावी कारवाई केली नाही. या घटनेमुळे प्रशासनाच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झाडांच्या छाटणीसाठी निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक रस्त्यांवर धोकादायक झाडे कायम आहेत. त्यामुळे कामे प्रत्यक्ष झाली की, केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून बिले मंजूर करण्यात आली, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पुढे बोलताना, “ठेकेदार मालामाल आणि जनता संकटात” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशातून मंजूर होणाऱ्या विकासकामांचा लाभ नागरिकांना मिळण्याऐवजी काही ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेलाच होत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्यक्षात कामांचा दर्जा तपासला जात नाही, अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात नाही आणि नागरिकांच्या तक्रारींकडेही गांभीर्याने पाहिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

कठोर कारवाई करण्याची मागणी
जर पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी व्यवस्थित झाली असती, तर आज ही घटना घडली असती का? या घटनेत सुदैवाने केवळ वाहनाचे नुकसान झाले; एखादा नागरिक, विद्यार्थी किंवा दुचाकीस्वार त्या ठिकाणी असता तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारली असती? या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून झाडांच्या छाटणीसाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर, काम करणारे ठेकेदार, कामाची प्रत्यक्ष पाहणी करणारे अधिकारी आणि काम पूर्ण झाल्याचे प्रमाणित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. तसेच, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी नंदू वारुंगसे यांनी मागणी केली.
Exit mobile version