। मुंबई । प्रतिनिधी ।
मालाडमधील एका शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत शाळेतील शिपायाने गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिपायाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरकृत्य केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या पालकांनी तत्काळ शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, आरोपीबाबत स्पष्ट माहिती देण्यास शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, शाळेची बदनामी होऊ नये या हेतूने शाळेच्या सीईओंनी प्रकरण बाहेर जाऊ नये म्हणून मुलीच्या पालकांवर दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (30) आणि शाळेचे सीईओ अनंत यज्ञीक (65) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.






