शिवरायांच्या जयंतीचा विसर
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद आंत्रट नीड शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा विसर पडलेला दिसून येत आहे. आज किंवा काल या दोन्ही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळ्यानिमित्ताने कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता.
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आंत्रट नीड शाळेमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत वर्ग भरत असतात. जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना, दुसरीकडे जिल्हा परिषद शाळा आंत्रट नीड या शाळेमध्ये महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमेचे पूजन केले नाही. तसेच महाराजांच्या प्रतिमेला हारसुद्धा घातलेला नाही. शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांना 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा विसर पडलेला दिसत आहे. महाराजांच्या प्रतिमेला कपड्याने पुसून स्वच्छदेखील केली नाही.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये दि. 18 ते 19 फेब्रुवारी महाराजांची पालखी सोहळा व प्रतिमा पूजन केले जाते.परंतु, आंत्रट नीड या शाळेमध्ये महाराजांची प्रतिमा धूळखात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, यावर गटविकास अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावर कारवाई करणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.