। ठाणे। प्रतिनिधी ।
राज्यात अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच गुरुवारी दुपारी भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात आणखी एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी आपल्या लहान भावासोबत घराच्या खाली खेळत होती. यावेळी त्या इमारतीत राहणाऱ्या आरोपीने तिला खाऊ खाण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले आणि बहाण्याने आपल्या फ्लॅटमध्ये नेले. फ्लॅटमध्ये गेल्यानंतर आरोपीने मुलीच्या भावाला पाणी आणण्यासाठी बाहेर पाठवले. भावाला बाहेर पाठवताच आरोपीने चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार केला.
अत्याचारानंतर मुलीने रडत-रडत घरी आल्यावर पालकांना सर्व प्रकार सांगितला. मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत तात्काळ कारवाई केली. शहरातून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा संताप व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवासी म्हणाले, “लहान मुलींसाठी घराबाहेरही सुरक्षितता राहिलेली नाही. पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी.” नारपोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध योग्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.







