। म्हसळा। प्रतिनिधी ।
तालुक्यातील देवघर परिसरात अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवरून परिचय वाढवत मुरुड येथील आरोपीने मुलीशी संपर्क साधत सोबत आली नाहीस तर तुझ्या आईचा जीव घेईन अशी धमकी देऊन मुलीवर मानसिक दबाव टाकला. भीतीच्या छायेत मुलीला जबरदस्ती फिरायला नेण्यात आले. मुलीने सातत्याने नकार दिल्यानंतरही आरोपीने नाही आलीस तर तुलाही मारून टाकीन अशी धमकी देत तिला सोबत घेऊन जंगल भागात लैंगिक अत्याचार केला. सायंकाळी मुलगी घरी परतल्यावर आईने विचारपूस केली असता तिने घडलेली घटना आईला सांगितली. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या दोन तासांत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे तसेच म्हसळा पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पोलीस पथकाने दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
