एमआयडीसीने तोडला पाणीपुरवठा
| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी बिलाची तब्बल 76 कोटी 94 लाख 93 हजार 980 रुपयांची अवाढव्य थकबाकी साचली आहे. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्याने एमआयडीसीने कठोर पाऊल उचलत 20 पैकी 8 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित केला असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता ज्ञानदेव सोनावणे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरण नगरपालिकेकडे सर्वाधिक 42 कोटी 75 लाख 5 हजार 231 रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये पाणी बिल, मंजूर कोट्यापेक्षा जास्त वापरलेला दंड आणि विलंब शुल्काचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या बाबतीत सुरू असलेल्या जोडण्यांपैकी 12 ग्रामपंचायतींकडे सुमारे 27.57 कोटी रुपये थकीत आहेत. खंडित केलेल्या जोडण्यांपैकी 8 ग्रामपंचायतींकडे सुमारे 6.62 कोटी रुपये थकीत आहेत, अशी स्थिती थकबाकीदारांची आहे.
प्रमुख थकबाकीदार ग्रामपंचायती (कोटींमध्ये) चाणजे- 11.19 कोटी, फुंडे- 3.85 कोटी, जसखार- 2.85 कोटी, चिरले- 2.67 कोटी, धुतुम- 1.69 कोटी, करळ- 1.17 कोटी, थकबाकी न भरल्यामुळे एमआयडीसीने 1. दिघोडे, 2. दादरपाडा, 3. वेश्वी, 4. पागोटे, 5. चिरनेर, 6. रंजनपाडा, 7. नवघर आणि 8. खोपटा या 8 ग्रामपंचायतींची पाणी जोडणी कापली आहे.
अनेक ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही, नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करूनही एमआयडीसीचे बिल भरत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मार्च 2026 अखेरची ही आकडेवारी प्रशासकीय चिंतेचा विषय बनली आहे.
ठरवून दिलेल्या कोट्यानुसार पाणीपुरवठा केला जात आहे, मात्र थकबाकी वाढत चालल्याने पाणीपुरवठा यंत्रणा चालवणे आणि विकासकामे करणे अडचणीचे ठरत आहे. थकबाकी वसुलीसाठी शासकीय निधीतून प्रयत्न केले जात आहेत, पण त्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.
ज्ञानदेव सोनावणे,
उपअभियंता, एमआयडीसी







