| उरण | प्रतिनिधी ।
समुद्रकिनारा म्हणजे मौजमजेची जागा की गाड्या दामटण्याचा रस्ता? माणकेश्वर-दांडा समुद्रकिनाऱ्यावर हौसेपोटी वाळूत स्कॉर्पिओ नेणाऱ्या सहा पर्यटकांना भरतीच्या पाण्याने चांगलाच हिसका दाखवला. वाळूत रुतलेली गाडी भरती वाढताच पाण्यात अडकली. सुदैवाने पर्यटक सुखरूप बचावले; मात्र स्कॉर्पिओचे मोठे नुकसान झाले.
कामोठे आणि खारघर येथील सहा पर्यटक सोमवारी (दि.7) सायंकाळी स्कॉर्पिओमधून माणकेश्वर-दांडा समुद्रकिनारी आले होते. वाळूत गाडी चालवण्याची हौस भागवल्यानंतर त्यांनी ती किनाऱ्यावरच उभी केली. भरतीचे पाणी हळूहळू गाडीच्या चाकांपर्यंत पोहोचले, तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही वेळातच गाडी वाळूत रुतली आणि वाढत्या भरतीमुळे ती पाण्यात अडकली.
गाडी बाहेर काढण्यासाठी पर्यटकांनी प्रयत्न केले; मात्र गाडी काही हलली नाही. अखेर स्थानिक नागरिक मदतीला धावले. बैलगाडीच्या साहाय्याने स्कॉर्पिओ बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रयत्नात बैलगाडी दोन वेळा उलटली. त्यानंतर मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक एकत्र आले आणि तब्बल दोन तास झुंज देत गाडी किनाऱ्यावर खेचून आणली. तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने या प्रकारात सहा पर्यटकांना कोणतीही दुखापत झाली नाही.
सूचना धाब्यावर; प्रशासनाची कारवाई कुठे?
माणकेश्वर-दांडा समुद्रकिनाऱ्यावर वाळूत वाहने नेऊ नयेत, असे स्थानिकांकडून वारंवार सांगितले जाते. तरीही काही अतिउत्साही पर्यटक समुद्रकिनाऱ्याला वाहनांचा ट्रॅक समजून गाड्या थेट वाळूत नेत आहेत. भरती-ओहोटीचा अंदाज नसताना समुद्राच्या इतक्या जवळ वाहन नेणे म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखेच आहे.
आज गाडी बुडाली, उद्या एखादा जीव गेला तर जबाबदारी कोणाची? दुर्घटना घडल्यानंतर मदतीसाठी धावणाऱ्या स्थानिकांवरच सगळा भार टाकण्याऐवजी प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.






