रायगड शेकापचे सिंहावलोकन

प्रा. डॉ. सुनिल पवार

2 ऑगस्ट- शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन.बघता बघता 74 वर्षे झाली शेकापच्या स्थापनेला.पुढील वर्षी शेकापचा अमृतमहोत्सव साजरा होईल.या साडेसात दशकांच्या काळात शेकापमध्ये अनेक स्थित्यंतरे घडली.पक्षाने अनेक चढउतारही अनुभवले.पण सर्वसामान्य,शेतकरी,कष्टकरी,गोरगरीब जनतेशी असलेली नाळ मात्र काही तुटू दिली नाही.आजही जिथे जिथे सर्वसामान्यांवर अन्याय होतो,शेतकर्‍यांची पिळवणूक होते त्या ठिकाणी शेकापने आवाज उठविल्याचे दिसून येते.आतापर्यंत चार पिढ्यांनी आपल्या परीन शेकापचा लालबावटा खांद्यावर घेऊन शेकापला उभारी देण्याचे काम केले.आता पाचवी पिढीही समर्थपणे आपल्या पूर्वजांनी खांद्यावर घेतलेला लालबावटा मोठ्या अभिमानाने घेऊन मिरवित आहे.
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय राजकारणामध्ये शेकापची भूमिका महत्त्वाची ठरली आहे .महाराष्ट्रामध्ये या पक्षाला विशेष स्थान आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये आजही हा पक्ष प्रबळ ठरला आहे .शेतकरी व कामगार यांचे हित जोपासणारा विचार मांडणारा ,योजना सुचविणारा असा एक गट सन 1947 मध्ये बहुजन समाजातील नेत्यांनी काँग्रेस अंतर्गत शेतकरी कामगार संघ या नावाने काढला. अखिल भारतीय काँग्रेस समितीने 1948 मध्ये आपल्या घटनेत दुरुस्ती करून काँग्रेस अंतर्गत स्वतंत्र घटना व कार्यक्रम असलेले पक्ष ,गट अस्तित्वात असणार नाहीत असे जाहीर केले त्यामुळे शेतकरी कामगार संघाच्या नेत्यांनी त्याच वर्षी काँग्रेसपासून वेगळे होऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.
रायगडमध्ये या पक्षाचा प्रभाव सुरुवातीपासूनच आहे तो आजही टिकून आहे.शेतकर्‍यांचे नेते नारायण नागू पाटील,भाऊसाहेब राऊत यांनी स्थापन केलेल्या शेकापची धुरा पुढे दत्ता पाटील, दि बा पाटील, रायगड जि.प.चे माजी अध्यक्ष स्व.प्रभाकर पाटील, दत्तुशेठ पाटील,या पिढीने सांभाळली.त्यानंतरच्या कालखंडात मोहन पाटील मीनाक्षी पाटील,आ.जयंत पाटील ,नाना सावंत, के आर मुंढे, ग.स.कातकर, पा रा सानप,वसंत राऊत,सुमंत राऊत, पंडितशेठ पाटील, विवेक पाटील, बाळाराम पाटील, अ.प.शेटे, धैर्यशील पाटील अशी एक साखळीच निर्माण झाली. त्यांच्या नेतृत्वातील रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाने जी वाटचाल केली ती विशेष आहे . त्यामुळेच आजही या पक्षाचा प्रभाव रायगड जिल्ह्यावर राहिलेला दिसून येतो.आता पक्षाची पाचवी पिढी समर्थपणे पक्षाचे नेतृत्व करताना दिसत आहे.
शेतकरी कामगार पक्षाची प्रारंभीची वाटचाल पाहता 1948 मध्ये पेण मुक्कामी पक्षाचे नेते काकासाहेब वाघ व नाना पाटील आणि नारायण नागू पाटील यांची भेट होऊन त्या चर्चेनुसार वडखळ पोयनाड येथे पक्षाच्या वतीने सभा भरल्या. या सभेला शेतकर्‍यांनी प्रचंड प्रतिसाद दिला .यावेळी कुलाबा विभागाचे नेतृत्व नारायण ना पाटील यांच्याकडे होते .त्यांनी आपल्या परीने पक्षाच्या विकासासाठी प्रयत्न केले . श्री नारायण ना पाटील जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांनी निस्वार्थीपणे कार्य केले. सन 1951 -52 च्या निवडणुकीमध्ये अलिबाग तालुक्यामधून ना ना पाटील यांची उमेदवार म्हणून नेमणूक झाली .मुंबई राज्यात पक्षाला 17 जागा मिळाल्या यामध्ये कुलाबामध्ये पक्षाचा प्रभाव जास्त होता . पक्षाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ना ना पाटील यांनी सन 1959 मध्ये पेण तालुक्यातील ठाकूर ,कातकरी आदिवासी ची जाहीर सभा भरलेली असताना त्याचे अध्यक्षपद भूषवले व आमदार गो. स .कातकरी यांनी आदिवासींच्या मांडलेल्या 11 मागण्याना पाठिंबा दिला. तसेच आपल्या भाषणांमध्ये आदिवासींना मार्गदर्शन केले . तसेच जनतेचे प्रश्‍न आपल्या कृषीवल या साप्ताहिकातून सातत्याने मांडून सरकारपर्यंत ते प्रश्‍न पोचविण्याचे कार्य कायम केलेले दिसून येते.
1957 मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आ. दत्ता पाटील विधानसभेत पोहचले. एक कुशल संसदपटू म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला .त्यांचे कार्य केवळ रायगड पुरते न राहता महाराष्ट्रभर पोहोचले. आर्थिक विकासाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात सहकाराची पायाभरणी केली. त्यांची वकिली ही पैसा कमवण्याचे साधन न बनता गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी होती.
आ. दत्ता पाटील यांनी 1957 1967 1978 1980 1985 ते1990 अशा सहा वेळा विधानसभेवर निवडून येऊन विधानसभा गाजवली .या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक चळवळ उभारून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी कोकण एज्युकेशन सोसायटी संस्थेमार्फत अगदी प्राथमिक पासून ते थेट विधी अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षणाची सोय त्यांनी करून दिली. विधानसभेमध्ये असताना आ. दत्ता पाटील यांनी राज्यातील, जिल्ह्यातील कष्टकरी ,कामगार ,दलित, आदिवासी यांना आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न केले .सभागृहाने नेमलेल्या महत्त्वाच्या विधेयकासंबंधीच्या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये त्यांची निवड केली यावरून त्यांच्या असलेल्या कायद्याच्या ज्ञानाचे आकलन होते .सन 1993 मध्ये महाराष्ट्र विद्यापीठ विधेयकासंबंधीच्या चिकित्सा समितीवर त्यांची निवड केली होती गरीब शेतकर्‍यांना अल्प व्याजदराने कर्ज देण्याची भूमिका त्यांनी रायगड जिल्हा सहकारी बँक व अर्बन बँक यांना बोलून दाखवली होती.
सन 1984 मध्ये वडखळ व जासई येथे शेतकरी कामगार पक्षातर्फे जमीन बचाव लढा पुकारला त्यामध्ये वाजेकर शेठ, दि बा पाटील यांच्याबरोबर दत्ता पाटीलही सामील होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये शेतकरी कामगार पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली.1958 मध्ये याच आंदोलनामध्ये दत्ता पाटील यांना तुरुंगवास भोगावा लागला तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न यावर आमदार दत्ता पाटील यांनी तारांकित प्रश्‍न मांडला.
शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्ह्यातील एक प्रभावी नेतृत्व म्हणजे आमदार दि.बा. पाटील हे होत. 1957, 1962, 1967, 1972, 1980 अशा तब्बल पाच वेळा विधानसभेवर पनवेल मतदार संघातून निवडून आले व 1977 व 1984 असे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले .आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचा सिडको विरोधातील प्रकल्पग्रस्तांचा साडेबारा टक्के चा फार्मूला आंदोलन विशेष गाजले .
रायगड जिल्ह्यातील बड्या कंपन्यांच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांच्या बाजूने शेतकरी कामगार पक्ष कायम उभा राहिला आ. जयंत पाटील यांनी आरसीएफच्या विरोधात भूमिका घेतली व कामगारांच्या बाजूने त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले.शेतकरी कामगार पक्षाने खारेपाटातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न , पिण्याच्या पाण्याचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले .आ. विवेक पाटील यांनी विधानसभेमध्ये पक्षाच्या वतीने लोकांच्या ज्वलंत प्रश्‍नावर विचार मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर आमदार मोहन पाटील यांनी आपल्या तब्बल 27 वर्षांच्या काळात खार जमिनींच्या विविध प्रकल्प बाबतच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवून शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला .तसेच आ. मीनाक्षी पाटील विधानसभेवर निवडून गेल्यावर मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री म्हणून त्यांची निवड झाली.त्यांनी खारेपाटातील लोकांचे प्रश्‍न मांडले. रेवस बंदराची योजना आणण्यामध्ये आमदार मीनाक्षी पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
डिसेंबर 1983 च्या विधानसभा अधिवेशनामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींवर ज्यावेळी चर्चा सुरू होती त्या शिफारशी संबंधी आमदार दि.बा. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी असे त्यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षाचे एक प्रभावी नेते म्हणजे प्रभाकर पाटील हे होत. ते जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रशासनाचे कार्य कार्यक्षमतेने चालले पाहिजे असा अट्टाहास केला. याचाच भाग म्हणून ते दर मंगळवारी सर्व पदाधिकार्‍यांची दुपारच्यावेळी साप्ताहिक बैठक बोलवत असत व नंतर त्यांच्या दालनात पदाधिकारी व खातेप्रमुख यांची संयुक्त सभा होऊन त्यामध्ये सर्व खात्यांचा आढावा घेतला जाई. याशिवाय तळे स्वतंत्र तालुका निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच जिल्हा परिषदेच्या स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी केलेले त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत मतदार संघातील आमदार म्हणजे वसंत राऊत हे होत .त्यांनी विधानसभेमध्ये कुलाबा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नावर सतत आवाज उठवला. जिल्हा विकास मंडळे बरखास्त करण्याची सूचना या विषयी त्यांनी आपले विचार व्यक्त केले होते .तसेच मच्छिमार व्यवसायिकांना सबसिडी द्यावी यासंबंधी त्यांनी सभागृहांमध्ये मागणी केली. शेकाप पक्षाचे आमदार म्हणून गो. स. कातकरी यांनीही आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला दिसतो .विधानसभेमध्ये मागासलेल्या जातींची आर्थिक उन्नती विषयी मांडलेले विचार त्यांचे विशेष होत. मागासलेले जमातीच्या उन्नती विषयी त्यांनी मार्ग सुचवले तसेच मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी ज्यादा अनुदानाची मागणी केली होती. याचबरोबर जंगल कामगार सोसायट्यांच्या प्रश्‍नावर झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला.
शेतकरी कामगार पक्षाचे आ. पा.रा. सानप यांनी तत्कालीन शेतकरी चळवळीत सहभाग घेतला .शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात सक्रीय सहभागी झाले. सन 1957 च्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाले व विधानसभेमध्ये सदस्य झाले .विशेषता रोहा व मुरुड या भागांमध्ये औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. आ. के. आर . मुंढे यांनी सन 1962 ते 1967 या पाच वर्षांमध्ये विधानसभेत पक्षाच्या कार्यप्रणाली नुसार जनसामान्यांचे प्रश्‍न मांडले ते प्रश्‍न सोडविण्यासाठी आपल्या परीने त्यांनी प्रयत्न केले. आ. सुमंत राऊत यांनी 1967 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खालापूर मतदार संघातून त्यांची विधानसभेवर निवड झाली.घरातूनच त्यांना राजकीय कार्याचा वारसा मिळालेला असल्यामुळे त्यांनी विधानसभेमध्ये उल्लेखनीय कार्य केले . शे .का .पक्षाचे एक प्रभावी नेतृत्व म्हणजे नी.ज. सावंत हे होत .सन 1985 च्या निवडणुकीत रोहे माणगाव मतदारसंघातून ते विजयी झाले व विधानसभेवर निवडून गेले. त्यांचे विधानसभेतील कार्य उल्लेखनीय असे आहे .त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामधील शैक्षणिक चळवळी मधील त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. रायगड जिल्ह्यातील विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग दिला. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल चे आ. म्हणून दत्तूशेठ पाटील यांचेही कार्य महत्त्वाचे आहे .विधान सभेतील सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द महत्त्वाची होती . या कार्यकाळात त्यांनी जनतेच्या अनेक प्रश्‍नावर आवाज उठवला .तसेच रायगड जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्‍नांसंबंधी झालेल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग दिला. त्यांचे रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ मधील कार्य तेवढेच महत्त्वाचे होते. पेण- सुधागड तालुक्याचे शे.का पक्षाची धुरा सांभाळणारे नेते म्हणजे आमदार मोहन पाटील होत .तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तरुण नेतृत्व म्हणून लोक त्यांना भाई म्हणून आदराने ओळखू लागले .विधानसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले त्यांच्या या कार्य काळामध्ये मतदारसंघातील रस्ते, साकव पूल ,समाजमंदिरे, प्राथमिक शाळा इमारत ,विद्युतीकरण इत्यादी कामे त्यांनी आपल्या फंडातून केली. पेण तालुक्यातील खारभूमी प्रश्‍न, भातशेतीचे नुकसान ,पूरग्रस्तांचे प्रश्‍न, पुनर्वसनाचे प्रश्‍न त्यांनी विधानसभेत मांडले .सन 1999 मध्ये महाराष्ट्र शासनाचे फलोद्यान, खारभूमी ,रोजगार हमी या खात्याची धुरा राज्यमंत्री म्हणून त्यांनी सांभाळली. शेतकरी कामगार पक्षाचे आ. विवेक पाटील यांची सन 1995 ते 1999 या कालावधीमधील राजकीय कारकीर्द अतिशय महत्त्वाची आहे रायगड जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यामुळे होणारे प्रदूषण यासंबंधी त्यांनी सभागृह मध्ये विचार मांडले व या प्रश्‍नावर उपाययोजना सुचवली . राज्यातील विविध कला ,साहित्य क्षेत्रातील वृद्ध कलावंतांना मानधन देण्याबाबत सभागृहांमध्ये त्यानी मागणी केली.
विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाने सतत राजकारणातून समाजकरणाला महत्त्व दिले आहे. रायगड जिल्ह्याप्रमाणेच इतर जिल्ह्यातील समाजाच्या समस्या सोडवण्यामध्ये पक्षाच्या नेत्यांनी मोठी भूमिका पार पाडल्यामुळे हा पक्ष येथील जनतेमध्ये कायमचा रुजला गेला व त्यामुळेच तो आजही या जिल्ह्यांमध्ये प्रभावी पक्ष म्हणून टिकून राहिला आहे.

Exit mobile version