वैद्यकीय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत व अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागाव ग्रामपंचायत येथे गुरूवारी (दि.3) मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आले. या शिबिरामध्ये रक्त तपासणी, रक्तदाब, वजन तसेच विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. तसेच, नागरिकांना आवश्यकतेनुसार औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले.

या शिबिराला सरपंच हर्षदा मयेकर यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांची विचारपूस केली. तसेच, त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीच्या सदस्या व कर्मचारीवर्गाने शिबिराच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच, शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्यावतीने औषधशास्त्र विभागाचे डॉ. सरबजीत मंडळ, प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोग विभागाचे डॉ. सुदर्शन, बालरोग विभागाचे डॉ. सुव्हेर, दत्त विभागाच्या डॉ. हेतल गुजराथी, समाजसेवा अधीक्षक चित्रा ठाणगे, समाजसेवा अधीक्षक शुभांगी मोकल, अधिपरिचारिका अश्विनी बाप्टे, इबीनेबर वळवी, गौरी शिद, औषधनिर्माता दिपाली राजापुरे, प्रशिक्षणार्थी विशाल पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ निलेश भांडे, शिपाई रितेश वर्तक व वाहनचालक शिवराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामुळे नागाव व परिसरातील नागरिकांना आपल्या गावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version