अतिउत्साह पर्यटकांच्या जीवावर बेतला

पांडवकडा येथे अडकलेल्या 116 जणांची सुटका
खारघर | वार्ताहर |
पांडवकडा परिसरात धोकादायक स्थिती असल्याने पावसाळ्यात येथे पर्यटकांना जाण्यास मज्जाव आहे. त्यात कोरोनामुळे बंदी आहे. ती झुगारून काहीजण रविवारी (18 जुलै) या ठिकाणी पावसात भिजण्यासाठी गेले होते. मात्र जास्त पर्जन्यवृष्टी झाल्याने संबंधित पर्यटक या ठिकाणी अडकले. ही माहिती मिळताच सिडको अग्निशमन दल आणि खारघर पोलिसांनी संबंधित पर्यटकांना सुखरूप पणे बाहेर काढले. त्यांनी केलेल्या प्रयत्नाच्या पराकाष्टेमुळे या सर्व पर्यटकांचे जीव वाचले.

खारघर पोलीस ठाण्याच्यावतीने पांडवकडा परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्या आशयाचे फलक ठिकाणी लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा रविवारी काही पर्यटक गोल्फ कोर्स मैदानाच्या बाजूने पांडवकडा परिसरात गेले होते. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी डोंगरावरून खाली वाहु लागले. त्यामुळे संबंधित पर्यटकांना बाहेर येण्यासाठी जागाच राहिली नाही. पाणी वाढत असल्याने त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. जीव मुठीत धरून या ठिकाणाहून सुटका करण्याच्या अनुषंगाने ते धावा करु लागले. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांबरोबरच अग्निशमन दल त्याठिकाणी हजर झाले. 116 पर्यटकांमध्ये 78 महिला 5 मुले हे पलिकडे अडकले होते. फायर ब्रिगेडच्या जवानांच्या सहाय्याने सर्वांना सुखरुप बाहेर काढले. अडकलेल्या सर्वांनी अग्निशमन दल व नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले. तरी नागरिकांनी स्वताच जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी केले आहे.

Exit mobile version