ऑक्सिजन पार्क बनले पर्यटनस्थळ

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील सारडे गावातील ऑक्सिजन पार्क हे पर्यटकांसाठी आकर्षक असे ठरत आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्कची निर्मिती सारडे विकास मंचच्या माध्यमातून अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे व त्यांच्या सहकार्‍यांनी गावातील उजाड माळरान असलेल्या डोंगराचा कायापालट करण्याचा मनोदय उराशी बाळगत त्यादृष्टीने सुरुवात केली होती. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून आजच्या घडीला हे हिरवेगार पार्क पर्यटनस्थळ बनत आहे. तसेच, या पार्कला अल्पावधीतच कोमनादेवी ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

या ऑक्सिजन पार्कचे बदलते स्वरूप हे आजच्या धकाधकीच्या जीवनात होणारी झाडांची कत्तल त्यामुळे माणसाच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीचे संकट आले होते. त्यावेळी ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. हे भयानक दृश्य डोळ्यासमोर ठेवत निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे व त्यांच्या सहकार्‍यांनी ओसाड माळरानावर पार्क खुलविण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या या प्रयत्नाला काही वर्षांतच यश प्राप्त झाले. त्यानंतर या पार्कचे नाव ऑक्सिजन पार्क असे ठेवण्यात आले. जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याचा हा एक प्रयत्न होता.

तसेच, नागेंद्र म्हात्रे व त्यांचे सहकारी यांना पर्यटकांची संख्या वाढावी म्हणून हे पार्क आकर्षक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर परिसर हिरवेगार असल्याचे मनमोहक दृश्य बघूनच डोळ्यांचे पारणे फिटते. या ठिकाणी एक छोटेसे पोहण्यासाठी तलाव असल्याने पावसाळी पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Exit mobile version