रायगड पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथील शान हॉटेल आणि ओयो,लॉज येथे वेश्या व्यवसाय राजरोसपणे सुरु होता. रायगड पोलिसांनी या अवैध धंद्यावर छापा टाकून मंगळवारी रात्री कारवाई केली. वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवून लैंगिक अत्याचार केला जात होता. हा धंदा चालविणार्या तांडेल दांमत्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश तांडेल आणि त्याची पत्नी दोन आरोपी आहेत. हे दोघेजण चेंढरे येथे अवैधरित्या शान हॉटेल आणि ओयो लॉजिंगच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालवित होते. हॉटेलमध्ये येणार्या ग्राहकांना मुली पुरवून लैंगिक अत्याचार करवून घेत होते. ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. कारवाई करण्यासाठी एक बनावट ग्राहक तयार करून तो त्या हॉटेलमध्ये पाठविण्यात आला.
अलिबाग पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,व बांगलादेशी पथक यांनी मंगळवारी (दि.17) रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास त्या हॉटेलवर छापा टाकला. मुख्य आरोपी शैलेश प्रभाकर तांडेल(57) व त्याची पत्नी या दोघांंना ताब्यात घेतले. त्यानंतर हॉटेलची पाहणी केली असता त्या ठिकाणी गोरखधंदा सुरु असल्याचे दिसून आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर साळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, तानाजी वाघमोडे, महिला पोलीस हवालदार रसिका सुतार, जितेंद्र चव्हाण, रुपेश निगडे, महिला पोलीस हवालदार अस्मिता म्हात्रे, अर्चना पाटील, पोलीस हवालदार अक्षय पाटील, सचिन वावेकर, सदानंद झिराडकर, अमर जोशी, सुजय मगर, गणेश पारधी यांनी ही कारवाई केली. याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांच्या या कारवाईने अलिबागजवळील चेंढरे येथील वेश्या व्यवसायाचा धंदा उघडकीस आला. या गुन्ह्यातील आरोपींना अलिबागमधील न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. त्यांना सोमवारी (दि. 23)पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.