शंकरराव म्हसकर यांचे प्रतिपादन
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
40 वर्षांपूर्वी शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसे, त्या काळात आमदार पा.रा.सानप यांनी सहकार क्षेत्राची निर्मिती केली व शेतीचे मालक कुळ झाले पाहिजे यासाठी त्यांनी सर्वांना एकत्रित करून मोठा लढा व संघर्ष केला. पा.रा. सानप हे शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे झुंझार नेते होते. त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी त्यांचे कार्य अविरतपणे पुढे नेण्यासाठी तरुणांनी तंटे मिटविण्यात वेळ घालविण्यापेक्षा समाज संघटित करा, त्यांचा आदर्श निर्माण केला पाहिजे. समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत कै. पा.रा. सानप यांच्या स्मृतीदिनी कोलाड ग्रुप कुणबी समाजाच्या सभेत कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर यांनी व्यक्त केले.
कुणबी समाजनेते तथा माजी आमदार स्व. पा.रा. सानप यांचा 27 वा पुण्यस्मरण सोहळा कुणबी समजोन्नती संघ मुबंई व रायगड जिल्हा समन्वय समिती ग्रामीण शाखा रोहा ग्रुप कोलाडच्या वतीने कोलाड येथील मंगल कार्यलयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खांब विभागीय नेते रामचंद्र चितळकर, नारायणराव धनवी, मारुती खांडेकर, अॅड. सुनील सानप, राजेश सानप, पंचायत समितीच्या सदस्या वीणा चितळकर, विजय सानप, दिवान सानप, प्रमुख मान्यवर व आदी कोलाड विभागातील कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, सलग तीन वेळा दादासाहेब विधिमंडळात जनमतांवर निवडून गेले. त्यांनी विधिमंडळात ग्रामीण जनतेची व शेतकर्यांची उपजीविका म्हणून शेती, त्यामुळे त्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, तसेच बेदखल कुळांचा प्रश्न यासाठी आवाज उठवत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन गणेशाला व शिवछत्रपती शिवरायांना वंदन तसेच माजी आ. कै.पा.रा. सानप यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवाते यांनी, तर प्रास्ताविक अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी केले व आभार महेश ठाकूर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश सानप, राजेश कदम, डॉ. मंगेश व डॉ. सागर सानप, सह कोलाड ग्रुपच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.






