सोगाव मुस्लिमबांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कर्नाटक राज्यातील समाजकंटकांनी तेथील महाविद्यालयामध्ये हिजाबवर बंदी घालण्याची मागणी करत धुडगूस घातल्यामुळे मुस्लिम धर्मातील मुली व महिलांनी संताप व्यक्त करत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आंदोलन करत निषेध नोंदवून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील सोगांव मुस्लिम समाजातर्फे जमातुल् मुस्लिमिन सोगांव ट्रस्टचे अध्यक्ष वस्सीम कुर यांनी हिजाब प्रकरणात कर्नाटक राज्यातील समाजकंटकांविरोधात जिल्हाधिकारी रायगड यांना निवेदन देत निषेध नोंदवला आहे.
याबाबतीत अधिक माहिती देताना वस्सीम कुर यांनी सांगितले की, मुस्लिम धर्मात महिला व मुली हिजाब, बुरखा,नकाब आदी परंपरागत वस्त्रे परिधान करतात, तो आमचा सामाजिक हक्क आहे, आम्ही ते परिधान करणारच, त्याला विरोध करण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. हिजाबला विरोध करत कर्नाटकातील महाविद्यालयामध्ये घुसून काही समाजकंटक मुस्लिम विद्यार्थिनीनां हिजाब,बुरखा परिधान करू नको, असे विरोध करत नाहकचा त्रास देत त्या मुलीचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, त्यामुळे आम्हा नागरिकांच्या व महिलांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.अश्या कृत्यांमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव चालू आहे,यावर कर्नाटक सरकारने त्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी व गुण्यागोविंदानं राहणाऱ्या नागरिकांना व समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने आम्ही सर्व बांधव करत आहोत,असे शेवटी सांगितले.