माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत आगेकूच
| माद्रिद | वृत्तसंस्था
भारताची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिने माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिली. सिंधू हिने बुधवारी (दि.27) कॅनडाच्या वेन यू झँग हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत पुढल्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही. सिंधू हिला मागील स्पर्धेमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तिला जागतिक क्रमवारीत 49 व्या स्थानावर असलेल्या वेन यू झँग हिचा सामना करावयाचा होता. पहिल्या गेममध्ये झँगकडून प्रतिकार मिळाला. मात्र ब्रेकनंतर सिंधूने झोकात पुनरागमन केले. सिंधू – झँग यांच्यामध्ये 14-14 अशी बरोबरी झाली. त्यानंतर सिंधूने मागे वळून बघितले नाही. भारताच्या फुलराणीने हा गेम 21-16 असा जिंकला.
दुसर्या गेममध्ये भारताच्या अनुभवी सिंधू हिच्या झंझावाती खेळासमोर झँगचा निभाव लागला नाही. सुरुवातीला 4-4 अशी आघाडी असलेल्या या गेममध्ये सिंधू हिने त्यानंतर 11-6 अशी आघाडी घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. झँग हिला दबावाखाली आपला खेळ उंचावता आला नाही. अखेर सिंधू हिने या गेममध्ये 21-12 अशी बाजी मारली. तिने 30 मिनिटांमध्ये या लढतीत विजय साकारला.
अश्मिताचा पराभव भारताची महिला खेळाडू अश्मिता छलीहा हिला मात्र पहिल्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. चौथी मानांकित राचनोक इंतानोन हिने अश्मिता हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय साकारला. इंतानोन हिने 21-13, 21-11 असा विजय संपादन केला. अश्मिताचा 28 मिनिटांमध्ये पराभव झाला.