पाच्छापूर शाळेतील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प

नका वापरू प्लास्टिकची थैली, हाताने शिवली कापडी पिशवी भली

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

वाढत्या प्रदूषणाच्या काळात प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सुधागड तालुक्यातील पी.एम. श्री जिल्हा परिषद शाळा, पाच्छापूर येथील विद्यार्थ्यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. इको क्लब अंतर्गत आयोजित उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुती कापडी पिशव्या तयार करून प्लास्टिकमुक्त समाजाचा संदेश दिला.

नाडसूर केंद्रांतर्गत येणाऱ्या या शाळेत मुख्याध्यापिका माधुरी पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे जल, मृदा आणि प्राण्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुती कापड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. विषय शिक्षक भगवान हंबीर यांनी विद्यार्थ्यांना कापड कापणे, शिवणकाम आणि पिशवीला आकार देणे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. शिक्षक धनाजी कोपनर आणि कविता चोभे यांनी विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत प्रोत्साहन देत सर्जनशीलतेने पिशव्या तयार करण्यास मदत केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पिशव्यांमध्ये विविध आकार आणि कल्पक डिझाईन्स पाहायला मिळाल्या.

नाडसूर केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल राणे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. लहान वयातच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात केवळ कापडी पिशव्यांचाच वापर करण्याचा संकल्प यावेळी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ कौशल्याचा विकास झाला नाही, तर सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली आहे. शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.

Exit mobile version