कोथेरी प्रकल्पग्रस्तांना जागे ऐवजी पॅकेज

| महाड । प्रतिनिधी |

अनेक वर्षे रखडलेल्या महाड तालुक्यातील कोथेरी धरणासाठी शिरगाव येथील प्रकल्प बाधित कुटुंबांना जागे ऐवजी थेट आर्थिक पॅकेज देण्याच्या पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे धरण उभारणीच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला आहे. तसेच परिसरातील पाणीटंचाई बरोबरच सिंचनाचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे.

महाड तालुक्यात कोल आणि कोथेरी या दोन गावांच्या मध्यभागी जलसंपदा विभागाकडून धरण उभारण्यात येत आहे. या धरणाची मुळ मान्यता 1983 मधील आहे. मात्र, 2006 साली प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पण कालांतराने धरणाचे काम पुन्हा ठप्प झाले होते. महत्त्वाचे म्हणजे, 2019 मध्ये 120 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही महाड तालुक्यातील कोथेरी धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडल्याने धरणाचे काम पुन्हा थांबले होते. यावेळी काही प्रकल्पग्रस्तांना शिरगाव येथे जागा देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून पुनर्वसनासाठीच्या जागेत रस्ता, शाळा, विजेचे पोल, शाळा, स्मशान शेड, अंतर्गत रस्ते, मंदिराची कामे झाली आहेत. परंतु, पुनर्वसनाची प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्याने हा प्रश्‍न रेंगाळला होता.

मंत्रिमंडळात यावर शिक्कामोर्तब
लघुपट बंधारे प्रकल्पाच्या सरकारी नियमाप्रमाणे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घरांऐवजी एक लाख 60 हजार रुपये, त्याचप्रमाणे निर्वाह भत्ता, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त आर्थिक मदत, वाहतूक भत्ता, पशुधन गोठा असणार्‍यांना व छोट्या दुकानदारांना एक वेळची आर्थिक मदत, छोटे कारागीर व व्यापारी यांना एक वेळचे अनुदान, तसेच घर बदलल्यानंतर एक वेळचा पुनर्स्थापना भत्ता देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
‘या’ गावांना होणार फायदा
या धरणामुळे या परीसरातील कोल, कोथेरी, शिरगाव, कोंडीवते, किंजळघर, वडवली, मुठवली, कांबळे, दादली, चोचींदे, अशी 11 गावे सिंचनाखाली येणार आहेत. शिवाय या परीसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील सुटण्यास मदत होणार आहे. दोन किलोमीटरचे दोन कालवे या धरणातून काढले जाणार आहेत. या धरणप्रकल्पामुळे या परीसरातील जवळपास 495 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.या धरणातील काही पाणीसाठा महाड शहरासाठी राखीव ठेवला जाणार आहे.
मातीच्या प्रकारातील धरण
माती प्रकारातील या धरणाची उंची 33.92 मीटर तर लांबी 450 मीटर इतकी आहे. या धरणातून एकूण पाणीसाठा 8.80 दश लक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा 8.22 दश लक्ष घन मीटर एवढा आहे. या सिंचनाचा लाभ कोथेरी, कोल, शिरगाव, चोचींदे, मुठवली, दादली, किंजळघर, वडवली, कोंडीवते, राजेवाडी, कांबळे या गावांना होणार आहे.

शिरगाव येथील प्रकल्पबाधित कुटुंबांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याने या धरणातील अडचणी दूर झाल्या आहेत. सद्यःस्थितीमध्ये धरणाचे काम सुरू आहे.

गुणवंत शेलार, सहाय्यक अभियंता, जलसंपदा विभाग, महाड
Exit mobile version