कळंबोलीच्या स्टील मार्केटमध्ये पाकिटे उघड्यावर; आरोग्य विभागाच्या वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
सरकारी आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना मोफत वितरित करण्यात येणारी निरोधची पाकिटे चक्क कळंबोलीतील स्टील मार्केटच्या पदपथावर उघड्यावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाकिटांवर ‘गव्हर्नमेंट’ असा स्पष्ट उल्लेख असताना हे शासकीय साहित्य रस्त्यावर कसे पोहोचले, त्याची विल्हेवाट लावण्याची ही पद्धत आहे की वितरण व्यवस्थेतील निष्काळजीपणा, असे सवाल उपस्थित होत असून, आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कळंबोली स्टील मार्केट परिसरात व्यापारी, कामगार आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या परिसरातील पदपथावर गर्भनिरोधक निरोधची भरलेली पाकिटे मोठ्या प्रमाणात पडलेली दिसून आली. विशेष म्हणजे, ही पाकिटे शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मोफत वितरित केली जात असल्याचे त्यावरील छपाईवरून स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेले शासकीय साहित्य अशा प्रकारे उघड्यावर पडून राहणे गंभीर मानले जात आहे.
आरोग्य विभागाकडून अशा साहित्याचे नियोजनबद्ध वितरण होणे अपेक्षित असताना ही पाकिटे येथे कोणी आणली? कोणत्या शासकीय आरोग्य केंद्रातून त्यांचा पुरवठा झाला? वितरित न झालेल्या साहित्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकारामागे नेमके काय कारण आहे, हे चौकशीतूनच स्पष्ट होणार असले तरी संबंधित आरोग्य यंत्रणेने तातडीने दखल घेऊन पाकिटांच्या स्रोताची तपासणी करावी आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
