पदपथावर कचरा, प्रशासनाचे दुर्लक्ष
| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
देशात गेल्या वर्षी स्वच्छतेचा तिसरा क्रमांक पटकविणार्या नवी मुंबई पालिका प्रशासनाची स्वच्छता मोहिमेची लक्तरे अलीकडे वेशीवर टांगली जात आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पदपथावर ओला सुका कचरा टाकला जात असून, साफसफाई कामगारांना तो फावड्याने गोळा करून घनकचरा वाहतूक करणार्या गाडीत टाकावा लागत आहे.
केंद्र सरकारने सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या स्वछ भारत अभियानात नवी मुंबई पालिकेने पहिल्यापासून हिरीरीने भाग घेतला. स्वछता आणि सुशोभीकरण यावर पालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, तरीही अनेक ठिकाणी स्वछतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असल्याचे दिसून येते. सिबीडी सेक्टर 8 येथील पालिकेच्या क्रांतिवीर फडके विद्यालयाजवळील पदपथावर दररोज ओला सुका कचरा पडलेला दिसून येत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी असलेल्या दोन कचराकुंड्या आता गायब झाल्या असून, सर्वत्र पसरलेला हा कचरा जमा करताना साफसफाई कामगारांची तारांबळ उडते. पदपथावर पसरलेल्या या कचर्यावर भटकी कुत्रे तुटून पडत असल्याचे दृश्य आहे. कमी अधिक प्रमाणात हे दृश्य शहरात दिसून येते आहे.