शेतकरी शेतीच्या कामात मग्न; अनेक ठिकाणी पेरणी वाया
| खोपोली | प्रतिनिधी |
यंदा पावसाने दमदार सुरुवात केल्याने भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भात पीक उगवण्यासाठी जमिनीतील वाफसा मिळालाच नाही, त्यामुळे भाताचे रोप तयार होण्यात अडचणी निमार्ण झाल्या होत्या, अशा सर्व संकटावर मात करीत शेतकऱ्याने भाताची रोपे जगवण्यासाठी प्रयत्न केले.
आता भातशेती लागवडीच्या कामांनी वेग घेतल्याने कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर काही ठिकाणी शेतकरी संकटात सापडल्याने त्यांच्या भात शेतीचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती लागवडीखाली येत असून, शेतकरी विविध जातीची बियाणे पेरून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या वर्षीही बहुतांशी शेतकऱ्यांनी शेती लागवडीखाली आणण्यासाठी भात पेरणी केली खरी, परंतु या वर्षातील पावसाचे शेतकरी वर्गाची सर्व समीकरणे बिघडवली होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती संकटात आली होती. मे महिन्यापासून पडणाऱ्या अवकाळीमुळे जमिनीला वाफसा मिळालाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षात शेती करताना वेगवेगळे अडथळे निर्माण झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे
पेरणी केलेली भात बियाणे अनेक ठिकाणी कुजून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असतानाही आपली पारंपारिक भात शेती टिकावी यासाठी शेतकऱ्यांनी मेहनत घेत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी आपली कामे करण्यात मग्न असताना दिसत आहेत.
संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पेरणी केलेले भात बियाणे कुजून गेली असताना बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपली पारंपारिक भात शेती टिकवण्यासाठी मोठे प्रयत्न केले असताना थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांना यश आले असून काही ठिकाणी भात लागवड शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. तर शेतकऱ्यांनी मोठ्या संकटावर मात करत टिकवलेली भात शेती बहरावी यासाठी वरूण राजाने यापुढील काळात कृपादृष्टी शेतकऱ्यांवर ठेवावी.
ॲड.जयेश तावडे,
प्रगतशील शेतकरी







