। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका संगमेश्वर तालुक्यातील गडनदी लगतच्या गावांना बसला आहे. धो-धो कोसळणार्या पावसामुळे नदी पात्रालगतची भातशेती कुजून गेली आहे. मात्र, या सर्व नुकसानीकडे विमा कंपन्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
गेले महिनाभर अतिवृष्टीमुळे गडनदी लगत असलेल्या करजुवे, धामापूर, माखजन, सरंद, बुरंबाड, कोंडीवरे, आरवली आदी भागात नदीचे पाणी सलग 10 ते 15 दिवस भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने भातशेती कुजून गेली आहे. ही घटना विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या लक्षात आणून देऊनही याकडे विमा कंपन्यांनी पाठ फिरवली असल्याचे बुरंबाड येथील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य संदीप कवळकर यांनी सांगितले. बाधित क्षेत्र असलेल्या ग्रामपंचायतींनी विमा कंपन्यांना पंचनामे करण्याची विनंती करून देखील या विनंतीकडे विमा कंपन्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप संदीप कवळकर यांनी केला आहे. त्यामुळे या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने आता लक्ष देण्याची गरज आहे.
भविष्यात नुकसान होऊन शेतकरी अडचणीत येऊ नये, यासाठी शेतकरी आर्थिक भुर्दंड सोसून विमा भरत असतो. परंतु, शेतकर्यांवर प्रत्यक्ष वेळ आल्यावर विमा कंपन्या मात्र, या नुकसानीच्या भरपाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे येथील शेतकर्यांचे म्हणणे आहे. गडनदी लगतच्या शेतीचे पंचनामे होऊन विमा कंपन्यांनी विमा संरक्षण त्वरित द्यावे, अशी मागणी येथील शेतकर्यांकडून करण्यात आली आहे.
गडनदीच्या पुरामुळे भातशेती कुजली
