| खरोशी | वार्ताहर |
पेण तालुक्यातील सध्या भातशेतीच्या लावणी व आवटणीची कामे पूर्ण झाली असून उरली सुरली भाताची रोपे लावून भातशेती लागवडीखाली आणली आहेत. मात्र अति पावसामुळे भातशेती कुजून गेली असल्यामुळे पेण खारेपाट विभागातील शेकडो एकर भातशेती नापीक झाली आहे. त्यामुळे भाताच्या उत्पन्नात मोठी घट निर्माण होणार असून शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे.
लावणी आवटणीच्या कामा आगोदरच जोरदार पडलेल्या पावसामुळे शेकडो एकर भातशेतीला मोठा फटका बसल्याने खारेपाटातील तयार झालेली भातशेतीची रोपे कुजून गेल्याने दुबार पेरणी करावी लागली तरीही अती पावसामुळे भाताची रोपे खराब झाल्यामुळे अखेर शेतक-यांना आपल्या जमिनी ओसाड ठेवण्याची वेळ आल्याने पुन्हा एकदा खारेपाटातील शेतकऱ्यांना भाताच्या उत्पन्नात घट होणार असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.
भातशेतीत चांगले उत्पन्न घेता यावे यासाठी शेतकरी दरवर्षी नवीन महागडे बी बियाणे खरेदी करून पेरणी करत असतो. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नवीन भातबियाण्यांची विक्री केली जाते. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर भाताची रोपे व्यवस्थित लावणी नंतर शेतकरी लावणी-आवटणी करण्यासाठी शेतकरी तयारी करत असतो. मात्र यावर्षी सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे रोपे तसेच आवटणी केल्यानंतर भातशेतीही पाण्याखाली राहिल्याने भाताची रोपे कुजून गेली आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे..