तळा येथे प्रथमच यंत्राद्वारे भातलागवड

| तळा | वार्ताहर |
तळा तालुका हा प्रामुख्याने डोंगरी तालुका असून, भात हे प्रमुख पीक आहे. परंतु, दिवसेंदिवस भातशेतीचे क्षेत्र कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी अनेक कारणांबरोबर वेळेवर मजूर न मिळणे व दिवसेंदिवस वाढणारा मजुरीचा दर हे प्रमुख कारण आहे. तसेच पशुधनदेखील कमी झाल्यामुळे जमिनीच्या मशागतीसाठी बैलजोडी व नांगरणी देखील वेळेवर करणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून यंत्राद्वारे आधुनिक पद्धतीने भात शेती करणे हे काळाची गरज झाली आहे.

यासाठी कृषी विभाग-आत्मा यांच्यामार्फत तळा तालुक्यातील बेलघर येथे यंत्राद्वारे भातलागवड प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कुबोटा कंपनीचे किशोर गोडविंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. यावेळी सागर वाडकर मंडळ कृषी अधिकारी व कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय स्टाफ तसेच आत्मा यंत्रणेचे सचिन लोखंडे यांच्यासह तालुक्यातील 40 ते 50 प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजता राणेवाडी येथील हनुमान मंदिर हॉलमध्ये किशोर गोडविंदे यांनी यंत्राने भात लागवडीसाठी रोपवाटिका कशी तयार करावी व यंत्राने लागवड करणे याबाबत विविध चित्रफितींच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच यांत्रिक पद्धतीने लागवडीसाठी प्रति एकर 8-10 किलो बियाणे पुरेसे होते तेच पारंपारिक पद्धतीमध्ये 15 ते 16 किलो बियाणे वापरले जाते. त्याचबरोबर मजुरीचा देखील खर्च 90% पर्यंत बचत होऊ शकतो.तसेच रोपांसाठी राब भाजण्याची देखील आवश्यकता नसल्याने तो खर्च देखील वाचतो. अशा पद्धतीने एकरी 3500 ते 4000 रुपयांमध्ये आपण कशाप्रकारे भात शेती करू शकतो याविषयी सादरीकरण केले. या पद्धतीने भात शेतीचा खर्च वाचला तर नक्कीच भात शेती परवडू शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच 100 टक्के यांत्रिक पद्धतीने भात शेती केल्यामुळे मजूर टंचाईवर मात करू शकतो असे मत व्यक्त केले. यंत्रांसाठी कृषी विभाग मार्फत 50 टक्के अनुदान उपलब्ध असल्याचे सांगितले.

Exit mobile version