जिल्हाभरात भातकापणीला वेग

शेतकरी कामात मग्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यामध्ये भाताची रोपे कापणी योग्य झाली आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून कापणीची कामे सुरु झाली आहे. शेतकरी कापणीच्या कामात मग्न झाला आहे. आतापर्यंत 10 टक्क्यांहून अधिक कापणीची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या पंधरा दिवसांत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यामध्ये यंदा सुमारे 94 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातलागवड करण्यात आली होती. सुवर्णा, कोलम, रत्ना अशा अनेक भातपिकांवर शेतकर्‍यांनी भर देत पेरणी केली होती. जिल्ह्यात पावसाने उशिरा सुरुवात केली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रोपे लावणीची कामे सुरु झाली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही कामे पूर्ण झाली. यावर्षी भातासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. कापणीयोग्य भातपीक तयार झाले होते. परंतु, परतीच्या पावसामुळे शेतांसह सखल भागात पाणी साचले. त्यात तुडतुड्या व अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे भातकापणी लांबणीवर गेली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेेतामधील पाणी कमी झाल्यावर शेतकर्‍यांनी कापणीला सुरुवात केली. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात भातकापणीला सुरुवात झाली आहे.

सकाळी शेतावर जाऊन शेतकरी भातकापणीची कामे करीत आहेत. आतापर्यंत दहा टक्के कापणीची कामे पूर्ण झाली आहेत. भातकापणीची लगबग सुरू झाली असून, त्याचा वेगही वाढला आहे. शेतकरी भातकापणीच्या कामात मग्न झाले आहेत. काही ठिकाणी कापणी केल्यावर जागेवर झोडणीची कामे केली जात आहेत. तर काही ठिकाणी कापणी करून चार ते पाच दिवस उन्हात रोपे तापवून झोडणीची कामे करणार आहेत.

पावसामुळे भातकापणीची कामे पंधरा दिवस लांबणीवर गेली. शेतामध्ये पाणी साचल्याने भाताला कोंब आले. शेतकर्‍यांना या परतीच्या पावसाचा फटका प्रचंड बसला आहे. पाऊस थांबल्याने कापणीला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे.

सतीश म्हात्रे,
शेतकरी

पेंड्याचे बंध कालबाह्य होण्याच्या मार्गावर
भातकापणी झाल्यावर पाच दिवसांनी भातांच्या रोपांची बांधणी केली जाते. उडवी रचून शेतामध्ये ठेवली जातात. बांधणीसाठी पेंड्याचे बंध तयार करण्याचे काम शेतकरी करतात. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक भागात कापडी दोर बांधणीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे पेंड्याचे बंध कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
मजूर मिळणे कठीण
गावातील स्थानिक मजूर काम करण्यास दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे स्थानिक मजूर मिळणे कठीण झाले आहे. वेगवेगळ्या भागातून मजूर बोलावले जात आहे. विशेष म्हणजे, आदिवासीवाड्यांमधील मजुरांकडून कापणीची कामे करून घेतली जात आहे.
हजारो हातांना मिळतेय काम
जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भातकापणीला सुरुवात झाली आहे. भातकापणीमुळे वाड्या-वस्त्यांमधील बेरोजगार मजुरांना रोजगार मिळू लागले आहे. कापणी करण्यासाठी काही ठिकाणी 350 रुपये, तर झोडणीसाठी 600 रुपये मजुरी आहे. अनेक शेतांवर वाड्या-वस्त्यांमधील मजूर काम करीत आहेत. विशेष म्हणजे, आदिवासीवाड्यांमधील मंडळींना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
Exit mobile version