भात विमा एक रुपयात

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी शेतकर्‍यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफूटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभणार आहे.

कोकण विभागामधील शेतकर्‍यांना केवळ एक रुपयात भात पिकाकरिता पिक विमा काढण्यासाठी अंतिम मुदत दि. 15 जुलै आहे. खरीप हंगाम 2024 पिक विम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकर्‍यांना केवळ एक रुपयात भात पिकाकरिता पिक विमा उतरविता येईल. या योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत पिक विमा योजना राबविण्यात येणार आहे. भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये 51,760 प्रति हेक्टर आहे. ई-पीक पाहणी द्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखमी अंतर्गत निश्‍चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील अटी व शर्तींच्या अधीन राहून निश्‍चित केली जाईल.

Exit mobile version