मुरूडमध्ये भात लावणीला वेग

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर |

पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुरूड तालुक्यातील ग्रामीण भागात भात शेती कामाला वेग आला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील शिघ्रे, नागशेत, सायगाव, उंडरगाव, खारआंबोली, वावे, उसरोली, मजगाव, वालवटी, आदाड पंचक्रोशीत भात लावणी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शिघ्रे येथील शेतकरी रघुनाथ माळी आणि नागशेत-पारगान येथील शेतकरी धर्माजी हिरवे यांनी सांगितले की, तालुक्यात पारंपारिक पद्धतीने लावणी सुरू झाली आहे. रविवारपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे.

रविवारपर्यंत सुमारे 750 मिमी पाऊस पडल्याची माहिती मुरूड तहसील सूत्रांनी दिली. मजुरीने माणसे घेऊन शेतीची कामे जोरकसपणे सुरू आहेत. पावसाचा अनियमितपणा असला तरी आता पावसामुळे शेत जमिनीत पाणी असल्याने लावणीला वेग वाढला आहे. पाणथळ जमिनीवर तर अधिक वेगाने लावणीची कामे जोमाने सुरू आहेत असे चित्र दिसत आहे. पावसाची अजूनही गरज असून त्यावरच भात शेतीची मदार आहे. तालुक्यात 3 हजार हेक्टर जमिनीवर भात शेती केली जाते. भात पीक हे मुख्य पीक आहे.

Exit mobile version