| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी |
तालुक्यातील भातशेतीचे पीक पूर्ण तयार झाले असून, ठिकठिकाणी भात शेती कापणी आणि बांधणीची लगबग सुरू आहे. त्यातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे.
तालुक्यातील शिघ्रे, तेलवडे, वाणदे, खारआंबोली, विहूर, मजगाव , नागशेत, वावडुंगी, नविवाडी, गोयगान, उंडरगाव, टोकेखार, उसडी, नांदगाव, जमृतखार, नांदला, चिंचघर, मिठागर, सावली, काशीद, सर्वे, बोर्ली मांडला, बारशिव, दांडे, वाळवटी, उसरोली, आदाड, साळाव आदी विविध गावची भातशेती बहरली असून, कापणीसाठी पूर्ण तयार असल्याचे टोकेखार येथील पोलीस पाटील आणि शेतकरी कृष्णा रामजी माळी यांनी सांगितले.
मुरूडजवळील शिघ्रे, खारआंबोली, वाणदे, उंडरगाव तेलवडे वावडुंगी, नागशेत आदी पंचक्रोशीतील भातशेती दसऱ्याच्या वेळीच तयार झाल्याचे शेतकरी तुकाराम पाटील (वाणदे), रघुनाथ माळी (शिघ्रे) यांनी सांगितले. सध्या भात कापून शेतात पसरवून ठेवले जात आहे. नंतर गोलाकार मळणी रचली जाते. पावसावर येथील पारंपरिक भातशेती अवलंबून असून, मजुरी महागली आहे. मजुरीने माणसं मिळणे देखील दुरापास्त होत आहे. सकाळी दवबिंदू पडत असले तरी दुपारी कडक उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांना पावसाची भीती सतावत आहे.





