परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील शेतीला फटका
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याला मागील आठवडाभरापासून कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. दिवसभर उन्ह आणि सायंकाळनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन वादळीवाऱ्यासह येणाऱ्या पावसात कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापलेले भातपीक शेतातच राहिल्याने त्याला कोंब आले असून, पेंढा भिजल्याने तो कुजण्याची भीती आहे. त्यामुळे आगामी काळात गुरांच्या पेंढ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

फक्त घोषणा नको, तात्काळ मदत द्या: शेकापचे शिवराम महाबळेंची मागणी
रोहा तालुक्यात काही ठिकाणी वाऱ्या पावसामुळे उभी पिके शेतात आडवी झाली आणि धानाची मोत्यासारखी कणस चिखलात गाढली गेली. कापणी केलेले पीक त्याची कडपे पावसात भिजल्याने मोड आले, साठवलेले धान्य ओलाव्याने नासधूस झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावूनच गेल्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रूंचे पाट वाहू लागले असून, तो हताश आणि चिंतेत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वेळेत पंचनामे करून नुसत्या घोषणा न करता, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या, अशी मागणी शेकाप रोहा तालुका चिटणीस शिवराज महाबळे यांनी सरकारकडे केली आहे.
रोहा तालुक्यातील कोलाड, खांब, देवकान्हे, धामणसई भागातील शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनीतील पीक अक्षरशः चिखलात आडवे पडले आहे. काही पिकांची पूर्णतः नासाडी झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बळीराजाचे डोळे आता नुकसानभरपाई आणि मदतीकडे लागलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बळीराजाला नुसती घोषणा नको तर त्याच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्याला ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत असून रोहा प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी निवेदनातून करण्यात येणार असल्याचे शिवराम महाबळे यांनी सांगितले.

पावसामुळे शेतकरी देशोधडीला
रायगड जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे भातशेतीचे 100 टक्के नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी थेट राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून तात्काळ विशेष हेक्टरी मदत पॅकेज देण्याची मागणी केली आहे.
प्रसाद भोईर यांनी पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी प्रचंड आशेने केलेली भातशेती काढणीच्या तोंडावर पाण्यात बुडाली. शेतामध्ये पाणी साचल्याने भातपिके कुजली आहेत, कणसांना जागेवरच कोंब फुटले आहेत, तर काही ठिकाणी शेतजमीन वाहून गेली आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक अक्षरशः एका झटक्यात पाण्यात गेली आहे, शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे, जगावे की मरावे अशी अवस्था त्याची झालीय असे त्यांनी नमूद केले.
प्रसाद भोईर यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कुठलाही निकष न लावता तातडीने सरसकट पंचनामे सुरू करावेत आणि 10 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा. महाराष्ट्रातील जिल्ह्यांप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष मदत म्हणून त्वरित मंजूर करून थेट रक्कम जमा करावी. कृषी आणि महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानीचा सविस्तर अहवाल द्यावा. भविष्यात शेतकऱ्यांना पुन्हा शेतीत उभे राहता यावे यासाठी ‘चालू पीक कर्ज माफ करून’ पुढील हंगामासाठी पुनर्गठित मदत योजना जाहीर करावी, या मागण्यांचे निवेदन कृषीमंत्री भरणे यांना दिले आहे.
परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल
ऑक्टोबर महिना संपत आला तरी पावसाळा संपत नाही आणि लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात कापून ठेवलेले तर काही ठिकाणी शेतात उभा असलेले भातपीक शेतात कोसळले आहे. तालुक्यात 90 टक्के भाताचे पीक पाण्यात डुबले असून, भाताच्या पिकाला मोड येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाऊस कधी थांबणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
पावसासोबत सोसाट्याच्या वारा देखील येत असल्याने शेतकऱ्याच्या शेतातील भाताचे पीक पाण्यात आहे. भाताच्या तयार झालेल्या पिकाचे मोठे नुकसान होत असून, भाताचे पीक पाण्यात तरंगत असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. त्यात काही ठिकाणी किमान 15 दिवस भाताचे पीक पाण्यात कोसळले असल्याने त्या भाताच्या पिकाला मोड येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाताचे पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमच्या परिसरात भाताचे संपूर्ण पीक शेतात कोसळले आहेत. आजुबाजूला अशीच परिस्थिती असून, भाताचे पीक हातातून जाण्याची आम्हा शेतकऱ्यांना भीती वाटत आहे, अशी प्रतिक्रिया नेरळ खांडा येथील शेतकरी अनंता भोईर यांनी व्यक्त केली.

ओला दुष्काळ जाहीर करा; भाजपाचे मुरुड तहसीलदारांना निवेदन
गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भातपीक भिजून, वाहून नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन नुकसानभरपाई द्यावी. याबाबत भाजपाने मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांना निवेदन दिले आहे.
अवकाळी पावसामुळे मुरूड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगाम फुकट गेलेले आहेत. झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले व आता पुढील हंगामाकरिता शेतात पाणी असल्यामुळे वाल व तत्सम पिके शेतकरी घेऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही हंगाम फुकट गेले आहेत. भातपिकाचे नुकसान लक्षात घेऊन शासनाने मुरुड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, भातपीक नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी भाजपचे शैलेश काते, जनार्दन सदाशिव तथा आण्णा कंधारे, सुधीर पाटील, विनोद भगत, अभिजित पानवलकर, रमेश दिवेकर, राजेश दिवेकर, भरत महादान, इसरार पांगारकर, सुजित जमादार, धर्माजी हिरवे, प्रवीण भाटकर, धनेश गोगर, लक्ष्मण बुल्लू, जगदीश मांदाडकर, विजय तरे, हरेश आरकशी, उमेश माळी उपस्थित होते. भातपीक नुकसानीबाबत तलाठी, ग्रामसेवक व कृषीसेवक यांना आदेशित करण्यात आले असल्याचे तहसीलदार आदेश डफळ यांनी यावेळी सांगितले.





