नागोठणे विभागातील शेतकऱ्यांत संताप
| नागोठणे | प्रतिनिधी |
नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे तातडीने करण्याची गरज असतानाच नागोठणे विभागातील काही भागात अद्याप हे पंचनामे सुरू न झाल्याने त्यासाठी महसूल व कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांना मुहूर्त केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने बळीराजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यातील लागवडीखाली असणाऱ्या भातशेतीचे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पडलेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. नुकसानीबाबतचे रितसर पंचनामे करण्याची मोहीम सुरू झाल्याची माहिती शासकीय यंत्रणेकडून उपलब्ध होत आहे. मात्र, असे असले तरी नागोठणे विभागातील ऐनघर, पाटणसई तलाठी सजा अंतर्गत तसेच इतर काही भागात अद्याप शासकीय कर्मचारी पोहोचलेच नसल्याची माहिती रोहा पंचायत समितीचे माजी सभापती आणि पाटणसई येथील प्रगतशील शेतकरी सदानंद गायकर तसेच बाळसई येथील ज्येष्ठ शेतकरी मधुकर ठमके यांनी दिली. पेरणीपासून ते लागवडीपर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. भातशेती पाण्याखाली असल्याने आणि पंचनामे करण्यासही विलंब होत असल्याने भात कापणी करावी की, नाही अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी बांधव असल्याचे सांगून सदानंद गायकर व मधुकर ठमके यांनी शासनावर नाराजी व्यक्त केली.
रोहा तालुक्यातील 184 महसूल गावांत भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. आमच्याकडे केवळ 22 कर्मचारी असल्याने महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख व गटविकास अधिकाऱ्यांकडे याविषयी सहकार्य मागितले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अपार मेहनत घेऊन शेती केली आहे त्यांचा किमान झालेला खर्च तरी मिळावा यासाठी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पंचनामे करण्यास उशीर होत असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या भातशेतीचे फोटो काढून ठेवावेत, असेही सांगण्यात आले आहे.
महादेव करे,
तालुका कृषी अधिकारी, रोहा





