भातलावणीची कामे वेगात

आतापर्यंत 30 टक्के लावणीची कामे पूर्ण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. पाऊस सुरु झाल्याने भातलागवडीची कामेदेखील वेगाने सुरु झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 30 टक्के लावणीची कामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहेत.

भाताची रोपे लावणीयोग्य झाली होती. मात्र, शेतांमध्ये लागवडी योग्य पाणी नव्हते. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही शेतकर्‍यांनी पाईपद्वारे पाणी शेतांमध्ये घेऊन लावणीची कामे सुरु केली. मात्र, रविवार सात जुलैनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओसंडून वाहू लागले. धरणे पाण्यान भरू लागली. त्यात शेतांमध्येदेखील पाणी साचले. त्यामुळे शेतकरी सुखावून गेला. भात लावणीच्या कामांची लगबग सुरु झाली. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने, तर काही ठिकाणी कृषी विभागाने ठरवून दिलेल्या चारसूत्री धोरणाद्वारे लागवड करण्यावर शेतकर्‍यांनी भर दिला.

जिल्ह्यामध्ये 98 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 30 टक्के लावणीची कामे पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहेत. भातलावणीची कामे वेगाने केली जात आहेत. मजूरकर मिळत नसल्याने काही शेतकर्‍यांच्या कुटुंबातीलच मंडळी एकत्र येऊन भातलावणीची कामे करीत आहेत.

‘लावणी लाव पोरी बाजारा जाव…’ अशा अनेक प्रकारचे लोकगीते गात लावणीच्या कामांमध्ये शेतकरी मग्न झाला आहे. कधी ऊन तर कधी पाऊस या बदलत्या वातावरणाचा आनंद घेत शेतकरी भातलावणीची कामे करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

यंदा पावसामुळे भातलावणीच्या कामांना दहा दिवस उशीर झाला आहे. मजूरकर मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पावसाचा खेळखंडोबा सुरु आहे. तरीदेखील भातलावणीच्या कामांचा वेग वाढला असून, ही कामे उरकून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सतीश म्हात्रे, शेतकरी
Exit mobile version