| मुरूड | वार्ताहर |
मुरूड तालुक्यात सोमवारी पूर्व मोसमी पावसाने तालुक्याला झोडपून काढले. पावसाने तारांबळ उडवून दिली होती. त्यानंतर गुरुवारपर्यंत पाऊस पुन्हा गायब झाल्याने तापमान 31 सेल्सिअसपर्यंत वाढले होते. शुक्रवारपासून मेघगर्जनेसह मोसमी पाऊस पडायला सुरुवात झाल्याने भात पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली दिसत आहे. मोठा पाऊस पडण्याआधीच पेरणी आटोपून घेण्याची लगबग वाढली आहे.
शुक्रवार पहाटेपासून पाऊस सक्रिय झाल्याचे दिसून आले असून हवेतदेखील गारवा जाणवू लागला आहे. पाऊस नसल्यामुळे उकाड्याने मुरूडकर आणि आलेले पर्यटक हैराण होताना दिसून आले. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक दाखल होत असून गेस्टहाऊस मालकांनी यास दुजोरा दिला.
शुक्रवारपासून पावसाची रिमझिम सुरू असून शेती कामांना वेग आला आहे. धुळवाफे झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी कंबर कसली आहे अशी माहिती शिघ्रे येथील शेतकरी रघुनाथ माळी यांनी दिली. मुरूड तालुक्यातील विहुर, मजगाव, उसरोली, आदाड, खारआंबोली, उंडरगाव, शिघ्रे, वाणदे, जोसरांजन, तेलवडे, नागशेत वावडुंगी, सायगाव पंचक्रोशीत अनेक ठिकाणी शेतकरी भात पेरणीसाठी सरसावला आहे. घरातील सदस्य, मिळेल तसे मजूर घेऊन पेरणीला वेग आल्याचे दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, मजुरी वाढली आहे. मजूरदेखील मिळत नाहीत. अनेक तरुणांनी नोकरीसाठी मुंबई पुण्याची वाट धरली असल्याने शेती करणाऱ्या तरुणांची ओढ कमी होऊ लागली आहे. मुरूड तालुक्यातील भात शेती पूर्णपणे पावसावरच अवलंबून आहे. भात पेरणी केलेल्या शेत जमिनीत रोपे वर आली आहेत.