पावसाळी पर्यटकांना पर्वणी
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील काही धबधबे पर्यटनासाठी शासनाने बंदी आणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील डोंगरमाथ्यावर निसर्गाच्या कुशीतून घनदाट हिरव्या झाडीतून झेपावणाऱ्या दुधारी व सुरक्षित असलेल्या पडसरे धबधबा पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. सहज व थेट रत्यावरून वाहनाने पोहचता येणारा हा धबधबा अधिकच मनमोहक आहे. पडसरे धबधब्याने सुधागडच्या सौंदर्यात भर पडत आहे. पडसरे सह तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. पडसरे धबधब्याने सुधागडच्या सौंदर्यात भर घातली आहे.
या धबधब्यावर सहज पोहचता येते. शिवाय लहान मुले, पुरुष महिला आबाल वृध्दांना या धबधब्यावर मौजमस्ती करता येते. शिवाय वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था तसेच भोजनासाठी मोकळे मैदान असल्याने या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. सुधागड सह जिल्हा व मुंबई ठाणे कोकणातील पर्यटक यांना धबधब्यांची भूरळ पडली आहे. वाढते पर्यटन स्थानिकांना रोजगाराची संधी मिळवून देत आहे. येथील पिलोसरी येथील घपकी गाव, उद्धर, सिद्धेश्वर,भावशेत, आपटवणे, नाडसूर व पडसरे येथील धबधबे पर्यटकांनी गजबजलेले असतात. तसेच उन्हेरे व कोंडगाव येथील धरणांच्या ओसंडून वाहणार्या पाण्यात मौजमजा घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करत आहेत.
रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणा पर्यटक येथे येत असतात. थोडी खबरदारी व अतीउत्साह टाळल्यास शाळकरी,लहानमुले, महिला व तरुणांसाठी ही ठिकाणे सुरक्षित आहेत. त्यामूळे इतर तालुक्यातील पर्यटक देखिल येथे आवर्जुन येत असतात. त्यामूळे येथील छोटे हॉटेल व्यवसायिक व हातगाडीवाल्यांच्या उत्पन्नात भर पडते. तसेच घरून आणलेले चटकमटक व मांसाहारी पदार्थ देखील धबधब्या जवळ बसून खाण्याची देखील पर्यटक मजा घेतात. मात्र गर्दिच्या दिवशी येथे पोलीस तैनात ठेवण्यात यावेत अशी मागणी काही नागरीकांनी केली आहे.तसेच या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये या करिता रेलिंग, व संरक्षण कठड़े बसवावेत अशी मागणी जोर धरत आहे.
सुधागड तालुक्यातील पडसरे व विविध ठिकाणचे धबधबे खुपच आकर्षक आहेत. दुरवर कोठेही पावसाळी पर्यटनासाठी जाण्यापेक्षा येथे जावून चिंब भिजण्याचा आनंद घेतो. तसेच निसर्गाशी एकरुप देखिल होता येते.कुटूंबिय व महिलांसाठी देखिल हे धबधबे सुरक्षित आहेत. मात्र पर्यटकांनी अती उत्साह टाळावा व येथे कचरा करु नये.
सुमित पाटील, पर्यटक, ठाणे