भीतीच्या सावटाखाली पडवणेवाडी


। रत्नागिरी । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे पडवणेवाडी भीतीच्या सावटाखाली जगत आहे. वाडीच्या तिन्ही बाजूला असणारा समुद्र दिवसेंदिवस पडवणेवाडीला आपल्या कवेत घेत आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी हा निसर्गराजीने सजलेला प्रदेश आहे. काळाच्या ओघात ऐतिहासिक, साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, पर्यटन अशा विविध कारणांनी हा परिसर सिद्ध होत गेला. पण निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या प्रदेशाला सध्या निसर्गाचा प्रकोप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध प्रदेश या प्रकोपाला सामोरे जात आहेत. यापैकीच एक म्हणजे मालगुंड शेजारील पडवणेवाडी.

वरवडे या गावाचे मुलभूत अंग म्हणून ओळख असणार्‍या पडवणेवाडीकडे शासन आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे. पडवणेवाडी परिसरातील तली खाडी ही केसपुरची खाडी म्हणून ओळखली जायची. समुद्राने तिन्ही बाजूने वेढलेला परिसर, परिसरातील खाडी भाग आणि निसर्गाचा आल्हाद असे या वाडी भागाचे स्वरूप होते. मात्र हेच येथील स्थानिकांच्या जीविताला हानीकारक ठरेल, असा अदमास कुणालाच आला नाही. पण निसर्गाने याची जाणिव दिली आहे.या वाडीशेजारी कोणतीही संरक्षक भिंत किंवा कोणताही संरक्षक बंधारा नाही. यामुळे समुद्रातील लाटांच्या मार्‍याने तसेच खाडीच्या पाण्यामुळे या परिसरातील जमीन समुद्राच्या गर्भात वाहन जात आहे. नुकताच, वालुकामय जमिनीचा 15 फुट भाग फुटून वाहून गेला असून त्याचे क्षरण सुरूच आहे. यामुळे 25 घरांच्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला असून येथील स्थानिक शासन, प्रशासन यांच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत.

Exit mobile version