चित्रकार कुणाल साळवीचे मुंबईत चित्रप्रदर्शन

| कर्जत | प्रतिनिधी |
मूळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पण शिक्षणासाठी कर्जतच्या दहिवलीमध्ये स्थायिक असलेल्या उदयोन्मुख चित्रकार कुणाल विजय साळवी याचे चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू असून, ते 16 मेपर्यंत पाहण्यासाठी खुले आहे. शालेय शिक्षणासाठी कोकणातून मुंबईत आल्यावर शाळेत चित्रकलेच्या तासाला तो विविध चित्रे काढू लागला. मनाच्या कॅनव्हासवर लहानपणी उमटलेले विविध रंग होतेच. ते अपोपाप कागदावर उतरत गेले. आणि साकार होत गेली काही चित्रे ज्यांच्यामुळे शिक्षकांना त्याच्यातील वेगळेपण जाणवले. आणि त्यांच प्रोत्साहन आणि वेळोवेळी मार्गदर्शन त्याला मिळत गेले. आणि त्याने मनाशी निर्णय दृढ केला तो चित्रकार बनण्याचा.


आर्ट कॉलेजमध्ये शिकत असताना मुंबईतल्या विविध रस्त्यांनी, गल्ली बोळांनी फिरत असताना अनेक जागांनी तो भारावून जात असे. ती प्रत्येक ठिकाणे त्याला नवीन होती. मला खुणावत होती. तो त्यांच्याकडे आकर्षित होत गेला. कोकणातल्या देखाव्यांनंतर त्याच्या मनावर राज्य केलं ते ह्या मुंबईतील वेगवेगळ्या जागांनी. कोकणातील समृद्ध जीवन दाखवताना सोबतच ही मुंबईतील चित्रे तो साकारत होती. या प्रक्रियेत त्याचा नेहमी हाच प्रयत्न असे की चित्र हे मनाला भावणारे असावे. जशी त्याची चित्रे त्याच्याशी संवाद साधतात तशी त्यांचा तुमच्याशी देखील संवाद साधला गेला पाहिजे असा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्याच्या चित्रांची भुरळ परदेशी चित्र रसिकांना सुद्धा आहे. त्याच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये सुरू असून ते 16 मेपर्यंत असणार आहे.

Exit mobile version