मोहम्मद रिझवान ठरला विजयाचा हिरो
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एकदिवसीय विश्वचषक 2023मध्ये मंगळवारी श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला 345 धावांचं बलाढ्य आव्हान दिलं होतं. जे पाकिस्तानने सहज पार केलं. पाकिस्तानच्या या विजयामध्ये मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी महत्वाची भूमिका बजावली. या दोघांनी झळकवलेल्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला.
श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर कुसल परेरला भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या कुसल मेंडिसनं संयमी खेळ केला आणि आपलं शतक झळकवलं. त्याला पथूम निसंका यानेही उत्तम साथ दिली. या दोघांनी 102 धावांची शतकी भागीदारी केली. त्यानंतर निसंका 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या सदिरा समरविक्रमाने मेंडिससोबत मिळून पाकिस्तानी गोलंदाजांना फटकावण्यां काम केलं. कुसल 77 चेंडूत 122 धावा करुन बाद झाला, ज्यात त्याने 14 चौकार आणि 6 खणखणीत षटकार खेचले. समरविक्रमा 108 धावा करुन बाद झाला आणि पाकिस्तानला 345 धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर इमाम-उल-हक 12 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार बाबर आझमही आल्या पावली परत गेला. त्याला फक्त 10 धावा करता आल्या. अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी खेळी करत डाव सांभाळला आणि पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. शफीकने 113 धावा केल्या, तर रिझवानने नाबाद 131 धावा केल्या. पाकिस्तानने 6 गडी राखून श्रीलंकेवर मात केली.