अखेर पाकला विजय गवसला

नेदरलँड्सवर सहा गडी राखून मात

| पर्थ | वृत्तसंस्था |

टी-20 विश्‍वचषक 2022 मधील दुसर्‍या गटातील पाकिस्तान आणि नेदरलँड्स संघात सामना खेळला गेला. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. नेदरलँड्स संघाने पाकिस्तान संघाला 92 धावांचे दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 13.5 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.

पाकिस्तान संघाने 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझमच्या रुपाने आपला पहिला गडी गमावला. बाबर आझम फक्त चार धावांवर बाद झाला. त्याचबरोबर फखर जमान देखील 20 (16) धावा करुन तंबूत परतला. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावांचे योगदान मोहम्मद रिझवानने दिले. त्याने 39 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. त्याचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले. नेदरलँड्स संघाकडून ब्रँडन ग्लोव्हरने 2 आणि पॉल व्हॅन मीकरेनने 1 बळा घेतले.

तत्पूर्वी, नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेदरलँड्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद केवळ 91 धावा केल्या. पाकिस्तानच्या भक्कम गोलंदाजीसमोर नेदरलँडचा संघ 100 धावाही करू शकला नाही. त्याच्या 11 पैकी फक्त दोन फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले.

नेदरलँड्सकडून कॉलिन अकरमनने सर्वाधिक 27 आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 15 धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने चार षटकांत 22 धावा देत तीन बळी घेतले. मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन षटकांत 15 धावा देत दोन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

Exit mobile version