पाकिस्तानची उपांत्य फेरीत जाण्याची आशा कायम!

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

विश्वचषकामध्ये पाकिस्तानने बांगलादेशला 7 गडी राखून पराभव केला आहे. या विजयामुळे पाकिस्तानने उपांत्यफेरीत जाण्याची आशा कायम ठेवली आहे. असे असले तरी पाकिस्तानला गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये जागा बनवणे अवघड आहे. बांगलादेशचा 2023 च्या विश्वचषकामध्ये हा सहावा पराभव आहे. पाकिस्तानसोबत हरल्याने बांगलादेश गुणतालिकेमध्ये सगळ्यात खालच्या क्रमांकावर गेला आहे.

पाकिस्तानला सलग चार पराभवानंतर विजय मिळाला आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना कोलकातामधील इडन गार्डनसमध्ये झाला. यात बांगलादेश 45.1 ओव्हरमध्ये सर्वबाद झाला. संघाला फक्त 204 धावा करता आल्या. दुसरीकडे, पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. पहिल्या जोडीने शतकी भागीदारी केली. पाकिस्तानने 32.3 षटकांमध्ये 3 गडी गमावून 205 धावा केल्या. 205 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फखर जमां आणि अब्दुल्ला शफीप यांनी जोरदार सुरुवात केली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानने गडी न गमावता 51 धावा केल्या. दोघांमध्ये पहिल्या गड्यासाठी 127 चेंडूमध्ये 128 धावांची मजबूत भागीदारी झाली. अब्दुल्ला शफीफ 69 चेंडूमध्ये 68 धावा करुन बाद झाला.

कर्णधार बाबर आझमला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 16 चेंडूमध्ये 9 धावा केल्या. सलामीला आलेल्या फखर जमां याने 74 चेंडूमध्ये 81 धावांची दमदार कामगिरी केली. अखेरीस मोहम्मद रिजवान (26 धावा) आणि इफ्तिखार अहमद (17 धावा) यांनी सामना शेवटपर्यंत नेला आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

Exit mobile version