। नेपियर । वृत्तसंस्था ।
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौर्यावर आहे. शनिवारपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात झाली असून पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेपियरला झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 73 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने 345 धावांचे लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 44.1 षटकात 271 धावांवर सर्वबाद झाला.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 344 धावा केल्या होत्या. विल यंग, निक केली आणि हेन्री निकोलस स्वस्तात बाद झाले होते. परंतु, नंतर मार्क चॅपमनने (132) शतक झळकावले, तर डॅरिल मिचेल (76) आणि मुहम्मद अब्बास (52) यांनी अर्धशतके झळकावली. त्यांच्यानंतर न्यूझीलंडच्या बाकी फलंदाजांनी स्वस्तात गडी गमावले. न्यूझीलंड संघ 344 धावांपर्यंत पोहचला.
त्यानंतर पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिक आणि उस्मान खान यांनी सलामीला फलंदाजी केली. 13 व्या षटकात उस्मान खान (39) बाद झाला. अब्दुल्ला शफिकही 36 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर बाबर आझम आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरत संघाला 150 धावांटा टप्पा पार करून दिला. बाबर आझमने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. परंतु, 83 चेंडूत 78 धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर आलेले तय्यब ताहिर (1), इरफान खान (0), नसीम शाह (0) आणि हॅरीस रौफ (1) झटपट बाद झाले. तरी, सलमान आघाने एक बाजू सांभाळत अर्धशतक केले होते; परंतु, तो देखील 58 धावा करून बाद झाला. शेवटी 45व्या षटकात अकिफ जावेदला बाद करत पाकिस्तानचा डाव संपवला. यावेळी रिझवान (30) धावांवर नाबाद राहिला.