। मुंबई । प्रतिनिधी ।
प्रथम श्रेणी गटाच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्टस्ने अंकुर स्पोर्टस्चा कडवा प्रतिकार 30-27 असा मोडून काढत ‘रामसिंग चषक’ आपल्या नावे केला आहे. गुड मॉर्निंगचा शार्दुल पाटील स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. विकास क्रीडा मंडळाने प्रभादेवी येथील राजाराम साळवी क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले होते.
यावेळी गुड मॉर्निंग संघाने पूर्वार्धात आक्रमक सुरुवात करीत 2लोण देत 22-11 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत आहे ती आघाडी टिकविण्यावर भर देत आपल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. शार्दुल पाटील, साहिल राणे यांच्या झंझावाती चढाया त्यांना सर्वेश पांचाळची मिळालेली बचावाची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. उत्तरार्धात अंकुरच्या सुशांत साईल, अभि भोसले, प्रयाग दळवी यांनी उत्तरार्धात आपला खेळ गतिमान करीत एका लोणची परत फेड केली. त्यामुळे सामन्याची रंगत देखील वाढली. परंतु, त्यांना अंकुरला विजेतेपद मिळवून देण्यात अपयश आले.
या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्टस्ने विजय नवनाथला 36-21 असे, तर अंकुर स्पोर्टस्ने सिद्धीप्रभा फाऊंडेशनला 37-25 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. अंकुरचा सुशांत साईल व गुड मॉर्निंगचा साहिल राणे हे स्पर्धेतील अनुक्रमे उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी हूपर देऊन गौरविण्यात आले.