तब्बल 17 वर्षांनंतर घडला चमत्कार
। चेन्नई । वृत्तसंस्था ।
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2008 नंतर अखेर चेपॉकवर विजयाची चव चाखली आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2025मध्ये चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी पराभूत केले आहे. 17 वर्षांपूर्वी आरसीबीने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली चेपॉकवर सामना जिंकला होता, त्यानंतर त्यांना 8 सामन्यांत हार पत्करावी लागली होती. मात्र, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने शुक्रवारी (दि.28) हा चमत्कार केला आहे. त्याचबरोबर स्टार फलंदाज विराट कोहलनेदेखील नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
चेपॉकवरील गोलंदाजीला मदत मिळणार्या खेळपट्टीवर बंगळूरूने 196 धावा उभारल्या. ज्यामध्ये आरसीबीच्या सलामीजोडीने पहिल्या बळीसाठी 45 धावांची भागीदारी केली. यावेळी फिल सॉल्टने 16 चेंडूंत 32 धावांची आक्रमक सुरुवात करून दिली. विराटला 13व्या षटकात 31 धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतर कर्णधार पाटीदारला जीवदान देणे चेन्नईला महागात पडले आणि त्याने 32 चेंडूंत 51 धावा केल्या. देवदत्त पडिक्कल 27 धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्यानंतर अंतिम षटकांमध्ये टीम डेव्हिडने 8 चेंडूत 22 धावा उभारल्या आणि चेन्नईला विजयासाठी तगडे आव्हान दिले.
लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आलेले चेन्नईचे खेळाडू राहुल त्रिपाठी (5) व कर्णधार ऋतुराज गायकवाड (0) स्वस्त्यात माघारी परतले. दुसर्याच षटकात दीपक हुडा (4) माघारी परतला. सॅम करनही (8) बाद झाला. मात्र, रचिन रवींद्र शर्तीचे प्रयत्न करीत मैदानावर उभा होता. मात्र, 13व्या षटकात रचिनचा (41) त्रिफळा उडाळा. त्याच षटकात शिवम दुबेचा (19) देखील त्रिफळा उडाला. यावेळी चेन्नई संघाची अवस्था वाईट होऊनही महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. धोनीच्या पुढे आर. अश्विन फलंदाजीला आला. त्यामुळे धोनीच्या या वागण्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अश्विन 11 धावांवर बाद झाला. धोनी फलंदाजीला आला तेव्हा चेन्नईला 28 चेंडूंत 98 धावा करायच्या होत्या आणि त्या अशक्यच वाटत होत्या, कारण त्यांचे 7 गडी बाद झाले होते. धोनीने 20व्या षटकात काही उत्तुंग षटकार खेचले, परंतु चेन्नईचा पराभव टाळण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही. धोनी 30 धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नई सुपर किंग्सला 8 बाद 146 धावा करता आल्या. त्यामुळे बंगळुरूने 50 धावांनी हा सामना जिंकला. 2008 नंतर बंगळुरूचा चेपॉकवरील हा पहिलाच विजय ठरला आहे. आरसीबीच्या जोश हेझलवूडने 3, यश दयाल व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
कर्णधाराची ‘रजत’ खेळी
सामन्यादरम्यान मैदानावर टीकून उभा राहिलेला विराट हळुहळू आक्रमक खेळ करू लागला होता. परंतु, नूर अहमदने त्याचाही काटा काढला. विराट 30 चेंडूंत फक्त 31 धावा करून माघारी परतला. या आयपीएलमधील ही स्ट्राईक रेटच्या बाबतीत सर्वात संथ खेळी ठरली. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारला दोन जीवदान देण्याची चूक चेन्नईला महागात पडली. त्याने 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रजत पाटीदार 32 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून 51 धावांवर झेलबाद झाला. त्यामुळे बंगळूरूला 196 धावा धावफलकावर जोडण्याची उभारी मिळाली.
कोहलीने रचला विक्रम
या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने विक्रम रचला आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये चेन्नईविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने चेन्नई विरूद्ध 1057 धावा करणार्या शिखर धवनला मागे टाकले आणि 1087 धावांसह यादीत अव्वल स्थान गाठले आहे. त्याचबरोबर कोहली, धवन नंतर रोहित शर्मा (896 धावा) आणि दिनेश कार्तिक (727 धावा) यांचा नंबर लागतो.