पाकिस्तानच्या कॅप्टन्सीचा वाद टिपेला

। लाहोर । वृत्तसंस्था ।

पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातील कर्णधारपदावरून उठलेले वादंग आता वेगळ्या दिशेला जात आहे. काही महिन्यावरच टी-20 वर्ल्डकप आहे अन् पीसीबीने शाहीन आफ्रिदीला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवले आहे. बाबर आझम पुन्हा एकदा कर्णधार झाला आहे. मात्र, शाहीन आफ्रिदी पीसीबीने हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले त्यावर नाराज आहे.

बाबर आझमला पुन्हा एकदा टी-20 संघाचा कर्णधार केल्यानंतर पीसीबीच्या वेबसाईटवर शाहीनचे एक वक्तव्य प्रसिद्ध केले होते. या वक्तव्यानंतरच शाहीन आफ्रिदी नाराज झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या वक्तव्यात शाहीन आफ्रिदीने बाबर आझमला पुन्हा टी-20चा कर्णधार करण्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मात्र, शाहीनने असं कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. या वक्तव्यातील पाकिस्तानचे नेतृत्व करायला मिळणं हा सन्मान अन् बाबर आझमला संपूर्ण पाठिंबा यावर शाहीनचा आक्षेप आहे.

आफ्रिदीची नाराजी ही खोट्या वक्तव्याच्या पलीकडील आहे. शाहीनला असं वाटते की, पीसीबीने त्याला कर्णधारपदावरून का हटवले, याचे योग्य स्पष्टीकरण दिलेले नाही. पीसीबीकडून स्पष्ट असा संवाद साधण्यात आला नाही. त्यामुळे संघात परस्पर विश्‍वासाचा अभाव आणि नैराश्य आले आहे.

Exit mobile version