पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान कायम

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा सामना पार पडला. न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह गुणांचे खातेही उघडले. या विजयामुळे पाकिस्तानने स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे.

या सामन्यात कॅनडाने पाकिस्तानसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग पाकिस्तानने 17.3 षटकात 3 गडी गमावत पूर्ण केला. पाकिस्तानच्या विजयात मोहम्मद रिझवानने अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानकडून रिझवानसह साइम आयुबने सलामीला फलंदाजी केली. या दोघांनी संयमी खेळी केली होती. पण पाचव्या षटकात आयुबला 6 धावांवर बाद केले. पण त्यानंतर रिझवानला कर्णधार बाबर आझमने भक्कम साथ दिली. या दोघांनी मिळून 63 धावांची भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तानसाठी विजयाचा मार्ग सोपा झाला. दरम्यान, पाकिस्तान विजयाच्या जवळ आलेला असताना बाबर 33 धावांवर बाद झाला. त्याला डीलॉन हेलिगरने बाद केले. यानंतरही रिझवानने डाव पुढे नेत अर्धशतक केले, मात्र फखर जमानही 4 धावांवर 18 व्या षटकात बाद झाला. पण तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 3 धावांचीत गरज होती. या तीन धावा रिझवान आणि उस्मान खानने पूर्ण केल्या आणि या स्पर्धेतील पाकिस्तानच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रिझवान 53 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 53 धावांवर नाबाद राहिला.

Exit mobile version