| पनवेल | प्रतिनिधी |
दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्र महिन्यात पनवेल परिसरातील गावोगावी यात्रा व पालख्यांना सुरुवात झाल्याने गावागावांमध्ये धार्मिकतेचे वातावरण आहे. दरवर्षी दूरवर असलेल्या प्रियजनांना एकत्र आणून नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या गाव यात्रांना नुकतीच सुरुवात झाली. चैत्र महिन्यात दरवर्षी गावातील गाव देव-देवीच्या जत्रा आणि यात्रांना सुरुवात होते. त्याची तयारी पनवेल तालुक्यातील विविध गावांत सुरू झाली आहे. पनवेल परिसरातील अनेक गावातील देवींच्या यात्रा या प्रसिद्ध आहेत. या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी गावाबाहेर नोकरी व्यवसायासाठी गेलेले ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. या यात्रांमध्ये गावातील हौशी कलाकार नाटक सादर करतात. यावेळी शासन काठी नाचविण्याचीही प्रथा अनेक गावांत आहे. त्यासाठी ग्रामस्थ महिनाभर मेहनत घेतात. या यात्रांमध्ये मांसाहारी मेजवानी असते. तसेच, दोन दोन दिवस चालणारे पालखी उत्सवही असतात. आजच्या आधुनिक काळातही पनवेल परिसरात शेकडो वर्षांची जत्रा आणि यात्रांची परंपरा कायम आहे. दोन ते तीन दिवस रंगणाऱ्या या यात्रेत पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. पालखी मिरवणूक गावभर फिरवण्यात येते. भाविकांच्या उत्साहामुळे देवीची पालखी माघारी मंदिरात येण्यासाठी कधी-कधी 36 ते 48 तासांहूनही अधिक कालावधी लागतो. त्यामुळे या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी जमते.






