उरणमधील पाले गाव जलमय

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील पाले गावात शनिवारी (दि.4) सकाळपासून वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे पाले गावातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते. या पुराच्या पाण्याचा फटका मुख्य रस्त्यावर असलेल्या साकाव पुलाच्या कामाचे रुंदीकरण न केल्यामुळे बसला असल्याचे नागरिकांकडून स्पष्ट बोलले जात आहे. संबंधित प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुराच्या पाण्याचे संकट ओढावले असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गावातील तरुणाईने पुराच्या पाण्यामुळे नदीचे स्वरूप प्राप्त झालेल्या पाण्यात होडी चालवून मनसोक्त जलविहाराचा आनंद घेतला. मात्र, येथील नागरिकांच्या घरातील चीज वस्तूंचे व संसार उपयोगी सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती माजी सरपंच वैभवी नंदकुमार म्हात्रे यांनी दिली. या गावावरून कोप्रोली ते आवरे असा नागरिकांच्या रहदारीचा मुख्य मार्ग गेला आहे. या मार्गाचे काम येथील स्थानिक ठेकेदारांनी केले आहे. मात्र या रस्त्यावरील पाणी जाण्याचा साकाव पुल हा अरुंद असल्यामुळे येथील डोंगर माथ्यावरून पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याचा या अरुंद साकावा मधून व्यवस्थितरित्या निचरा होत नसल्यामुळे, परिसरातील सखल भागात पाणी तुंबून हे पुराचे पाणी गावातील नागरिकांच्या घरामध्ये घुसले आहे.

Exit mobile version