नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान
। चिरनेर । प्रतिनिधी ।
चिरनेर गावाला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसला आहे. शनिवारी (दि.4) सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसले. यात संसार उपयोगी सामानाबरोबर चीज वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
चिरनेर ग्रामपंचायत हिंद टर्मिनल्स कंपनी आणि मामाश्री गोदामांसह उभारण्यात आलेल्या अन्य गोदामांच्या बांधकामामुळे व नव्याने सुरू असलेल्या मातीच्या भरावांच्या कामांमुळे पावसाचे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चिरनेर गावावर पुराचे संकट ओढावले आहे. येथील शेतजमीनी देखील पाण्याखाली आल्या असून, पाणी निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळे शेतीजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांची भात शेती पूर्णता पाण्याखाली आली आहे. शेतकऱ्यांनी आताच टाकलेले भाताचे बियाणे गेले चार दिवस पुराच्या पाण्यात बुडून गेले आहे. नवीन मातीचे भराव आणि गोदामामुळे पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा येत आहे.
गेल्या अनेक पिढ्यांपासून चिरनेर गावात वर्षानुवर्ष पावसाचे पाणी नैसर्गिक ओढे नाल्यांमधून कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहत होते. मात्र अलीकडे चिरनेर परिसरात गोदामांचे जाळे विणल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. गोदामांचे भराव उंचवताना पाण्याच्या प्रवाहाचा कोणताही तांत्रिक विचार केला गेलेला नाही. निचाऱ्यासाठी आवश्यक पाईप किंवा जलवाहिन्या न टाकल्याने पावसाचे पुराचे पाणी आडले जात आहे. संपूर्ण पाण्याचा प्रवाह गावासह भात शेतीकडे वळला आहे. त्यामुळे गावासह शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून आर्थिक संकटात सापडले आहेत.
विकासाच्या नावाखाली जर गावे पुराच्या पाण्याखाली येत असतील, तर असा विकास काय कामाचा, असा सवालही नागरिकांकडून विचारला जात आहे. याला संबंधित प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिरनेर गावावर ओढवलेले संकट असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळपासून जोर धरलेल्या पावसात चिरनेर गावातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. वाऱ्यासह शनिवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने सर्वांची झोपच उडाली.
घरांची तळी झाली
दरम्यान कळंबुसरे, मोठीजुई, विंधणे, दिघोडे, वेश्वी पाले आदी गावांनाही पुराचा फटका बसला आहे. तर कातळपाडा, मधीलपाडा, रांजणपाडा चिंचपाडा, मुळपाडा, कुंभारपाडा येथे रहिवाशांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. कातळपाडा हद्दीत येणारी माथेरान ही नवीन वसाहत देखील जलमय होऊन, येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरून घरांची तळी झाली आहेत.
चिरनेर गावात पूर परस्थिती उद्भवली आहे. वेअर हाऊस, मातीचे भराव, नैसर्गिक नाल्यांवरची अतिक्रमणे यामुळे नैसर्गिक नाल्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नसल्यामुळे चिरनेर गावाला पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे.
– जयवंती गोंधळी, मातृछाया फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षा







