| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
सध्या मुसळधार पाऊस आणि समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शासनाच्या मासेमारी बंदीमुळे पनवेल परिसरातील कोळी बांधवांच्या होड्या किनाऱ्यावरच उभ्या आहेत. मात्र, नारळी पौर्णिमेनंतर समुद्राची पूजा करून पुन्हा मासेमारीला सुरुवात केली जाणार असल्याने कोळीवाड्यांमध्ये आतापासूनच तयारीला वेग आला आहे. यादरम्यान, कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने मासे पकडण्यासाठी लागणारी जाळी विणणे, जुनी जाळी दुरुस्त करणे तसेच होड्यांची देखभाल करण्यात व्यस्त आहेत. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित आणि भरघोस मासेमारीसाठी प्रार्थना केली जाते. त्यानंतर पुन्हा होड्या समुद्रात उतरतात आणि मासेमारी हंगामाला सुरुवात होते. सध्या मासेमारी बंद असल्याने कोळी बांधवांवर आर्थिक संकट ओढवले असले, तरी आगामी हंगाम चांगला जावा, अशी आशा प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील कोळीवाड्यांमध्ये जाळी विणण्याचे आणि मासेमारीसाठी आवश्यक साहित्याची तयारी करण्याचे काम जोमात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.







