सुधागड-पाली | वार्ताहर |
नव्याने होऊ घातलेल्या पाली नगरपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवारी (ता.8) सायंकाळी पूर्ण झाली. यामध्ये 71 पैकी 23 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र विविध कारणांमुळे बाद करण्यात आले. यामुळे 13 प्रभागात 48 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
पाली नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी मंगळवारी (ता.7) सायंकाळ पर्यंत 90 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे बुधवारी (ता.8) 17 पैकी 4 ओबीसी प्रभागांतील निवडणूका होणार नाहीत. यामध्ये प्रभाग क्रमांक 2, 5, 8 व 14 या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रभागांसाठी आलेले 19 नामनिर्देशन पत्र बाजूला करण्यात आले आहेत. उर्वरित 13 प्रभागांसाठी 71 अर्ज आले होते. छाननीमध्ये त्यातील 23 अर्ज बाद झाले असून, 48 अर्ज वैध ठरले आहेत.
ओबीसी उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही म्हणून हे उमेदवार नाराज झाले आहेत. तरी देखील 4 जागांसाठी तब्बल 19 नामनिर्देशन पत्र आली होती. छाननीत बाद झालेल्या उमेदवारांपैकी काही प्रतिष्ठित व दिग्गज उमेदवारदेखील आहेत. त्यांचादेखील हिरमोड झालेला दिसला.