पाली बस स्थानक समस्यांच्या गर्तेत

नूतनीकरणाचे काम रखडले
प्रवाशांची प्रचंड गैरसोय

| सुधागड-पाली | वार्ताहर |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाचे नूतनीकरण मंजुरी येऊनदेखील मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. तसेच स्थानकाला खड्डे, डेब्रिज, उघडा नाला, दुर्गंधी आदी विविध समस्यांनी वेढले आहे. परिणामी, येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.

दीड वर्षांपूर्वी पाली बस स्थानकाची जुनी धोकादायक इमारत तोडण्यात आली आहे. त्यावेळी स्थानक आवारात तात्पुरत्या स्वरूपाची निवारा शेड व स्वच्छतागृह बांधण्यात आले. निवारा शेड छोटे असल्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी अडचण होते. मात्र, त्यानंतर आजतागायत परिवहन महामंडळ अथवा कंत्राटदाराकडून तेथे कोणत्याही स्वरूपाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. जुन्या इमारतीचे डेब्रिज व राडारोडा स्थानकात तसाच पडला आहे. स्थानकातील नाल्याचा स्लॅब तुटलेला आहे. त्यामुळे गाड्या ये-जा करण्यास अडथळा येतो. स्थानक आवारात पालीतील नाले व गटारांतील सांडपाणी येते. त्यामुळे येथे खूप दुर्गंधी पसरली आहे. स्थानकात मोठाले खड्डे पडले आहेत. प्रवाश्यांना पिण्यासाठी चांगले पाणी देखील नाही. अशा प्रकारे पाली बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.

स्थानकाचे नूतनीकरण व येथील समस्या मार्गी लावण्यासाठी अनेकदा उपोषण केले आहे. काही महिन्यांपूर्वी परिवहन मंडळाच्या कार्यकारी अभियंत्या व परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक रायगड आणि इतर अधिकारी स्थानकातील परिस्थिती पाहून गेले आहेत. मात्र त्यानंतर कोणतीही उपाययोजना व ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रश्‍नांवर पुन्हा उपोषणाला बसणार आहे. – रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, पाली

हे काम करणार्‍या ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले असून, त्याला काळ्या यादीत टाकले आहे. 15 दिवसांत नव्याने निविदा बोलावणे व नवीन ठेकेदार नेमण्याची आणि स्थानक नूतनीकरणाची कार्यवाही करण्यात येईल. शिवाय मंजूर निधीच्या अनुषंगाने स्थानकाचा नवीन आराखडा देखील बनविण्यात येईल. स्थानक आवारातील तोडलेल्या नाल्याच्या स्लॅब बाबत पाली नगरपंचायतीकडे पाठपुरावा करून नगरपंचायतीकडून हे काम करून घेण्यात येईल. – विद्या भिलारकर, कार्यकारी अभियंता, राज्य परिवहन महामंडळ मुंबई प्रदेश


तब्बल 2 कोटी 36 लाखांचा निधी मंजूर
नवीन बसस्थानक नूतनीकरणासाठी तब्बल 2 कोटी 36 लाखांचा निधी नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये मंजूर झाला होता. यामध्ये नवीन सुसज्ज भव्य इमारतीसह विविध सुविधा आदींचा समावेश होता. तसेच इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामास जानेवारी 2020 पासून सुरुवात होणार होती. मात्र नवीन इमारतीची अजून एक वीट सुद्धा बसविण्यात आलेली नाही.

Exit mobile version